मॉस्को: वृत्तसंस्था । रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांनी ब्रिक्स देशांच्या संमेलनात कोरोना लस विकसित करण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करण्याचे आवाहन केले. रशियाने विकसित केलेली स्पुटनिक व्ही या लशीचे उत्पादन भारत आणि चीनमध्ये सुरू करण्याचे आवाहन त्यांनी केले.
जगभरात कोरोनाच्या संसर्गाने थैमान घातले असताना त्याला अटकाव करण्यासाठीही प्रयत्न सुरू आहेत. अनेक देशांनी एकमेकांसोबत सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर भारत, ब्राझील, चीन, रशिया आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या ‘ब्रिक्स’ची व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे बैठक झाली.
यावेळी पुतीन यांनी सांगितले की, ब्रिक्स देशांद्वारे लस विकसित करणे आणि संशोधनासाठी केंद्र स्थापन करण्याच्या कामाला गती देणे आवश्यक आहे. दक्षिण आफ्रिकेने केलेल्या सूचनेवर सहमत असल्याचे पुतीन यांनी सांगितले. ब्रिक्सच्या शिखर परिषदेत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, ब्राझीलचे राष्ट्रपती जॅर बोल्सोनारो आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामफोसा यांनी सहभाग घेतला.
पुतीन यांनी सांगितले की, रशियाने विकसित केलेली ‘स्पुटनिक व्ही’ लशीचे उत्पादन भारत आणि चीन या ब्रिक्स देशांमध्ये करता येऊ शकते. रशियाच्या प्रत्यक्ष गुंतवणूक निधीने स्पुटनिक- व्ही लशीच्या चाचणीबाबत ब्राझील आणि भारतीय भागिदारांसोबत करार केला आहे. चीन आणि भारतातील औषध कंपन्यांसोबत लस उत्पादनाबाबत करारही केला आहे.
‘स्पुटनिक व्ही’ लस ही सामान्यत: सर्दी निर्माण करणाऱ्या विषाणूवर आधारीत आहे. या लशीची निर्मिती आर्टिफिशल पद्धतीने करण्यात आली आहे. . ही लस ९२ टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे.