कोरोना लशीवर जीएसटी कायम

 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कोरोना लशीवर जीएसटी  कायम राहणार असून रेमडेसिविरसह कोरोना सबंंधित औषधे आणि उपकरणांवर दिलासा देण्यात आला आहे.

 

वस्तू व सेवा कर  परिषदेची ४४वी बैठक आज  अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झाली. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर, राज्यांचे अर्थमंत्री आणि केंद्र व राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते.

 

अर्थमंत्री म्हणाल्या, ही बैठक फक्त एका मुद्यावर बोलविण्यात आली होती. मंत्री गटाचा  अहवाल ६ तारखेला आम्हाला देण्यात आला. हा अहवाल कोरोनाच्या उपचारांसाठी वापरल्या जाणार्‍या गोष्टींवर होता. त्यात केवळ तीन बदल केले गेले आहेत. हे सप्टेंबरपर्यंत लागू राहतील. दुसरे म्हणजे, आम्ही विद्युत उपकरणांवरील GST १२ टक्क्यांवरून ५ टक्क्यांपर्यंत कमी केली आहे.  लशीवरील जीएसटी ५ टक्के कायम राहील.”

 

जीएसटी परिषदेने लशींवर पाच टक्के कर दर कायम ठेवण्यास सहमती दर्शविली आहे. अर्थमंत्री म्हणाल्या की, केंद्र सरकार ७५% लस विकत घेईल आणि जीएसटी देखील देईल, परंतु जीएसटीमधून मिळणारे ७० टक्के उत्पन्न हे राज्यांसह वाटून घेतले जाईल.

 

“रुग्णवाहिकांवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १२ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. पल्स ऑक्सिमीटरवरील जीएसटी १२ वरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. ऑक्सिजन कंसेन्ट्रेटरवर कर कमी केला आहे. ब्लॅक फंगसच्या औषधांवर कोणताही कर लावला जाणार नाही. व्हेंटिलेटरवरील जीएसटीही १२ वरून ५ टक्क्यांवर आणला आहे. रेमडेसिविरवरील करही कमी करण्यात आला आहे. तो १२ ते ५ टक्क्यांपर्यंत कमी केला,” अशी माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली.

 

अर्थमंत्री म्हणाल्या की, ब्लॅक फंगसचे आणि टोसिलिजुमाब इंजेक्शनवर आधी ५ टक्के कर होता. तो कर रद्द करण्यात आला आहे. टेस्टिंग किटवरील कर १२ वरून ५ टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. सॅनिटायझरवरील कर १८ ते ५ टक्क्यांपर्यंत करण्यात आला.

 

जीएसटी परिषदेच्या २८ मे रोजी झालेल्या बैठकीत लस, औषधे, चाचणी किट आणि व्हेंटिलेटरवर जीएसटीमध्ये सूट देण्याचा निर्णय घेण्यासाठी मंत्र्यांचा गट गठित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता

 

Protected Content