कोरोना रुग्णांना महापौर देताय योगाचे धडे !

 

जळगाव (प्रतिनिधी) कोरोनाशी लढा देण्यासाठी स्वतःची रोग प्रतिकारक क्षमता मजबूत करणे आवश्यक आहे. एरव्ही कोरोनाच्या धास्तीने अनेक दिग्गज घरात बसून असताना जळगाव मनपाच्या महापौर सौ.भारती सोनवणे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि विलगीकरण केलेल्या व्यक्तींना योगाचे प्रशिक्षण देत आहेत. प्रसिध्द योगशिक्षिका हेमांगिनी सोनवणे रुग्णांचे मनोबल उंचावण्यासाठी मार्गदर्शन करतात. जागतिक योग दिनानिमित्त महापौर व योगशिक्षिका हेमांगिनी सोनवणे यांनी कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांना योगाचे महत्व पटवून दिले.

 

जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असले तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. जळगाव शहर मनपाकडून कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आणि संशयित व्यक्तींची व्यवस्था शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या हॉस्टेलमध्ये करण्यात आली आहे. महापौर सौ.भारती सोनवणे स्वतः दररोज रुग्णांना फोन करून माहिती घेत असल्याने सर्व सोय सुविधा योग्यप्रकारे ठेवल्या जातात. आजवर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये एकही रुग्ण दगावला नाही ही बाब कौतुकास्पद आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात शहरातील रुग्णांचा बरे होण्याचा दर सर्वाधिक आहे.

 

महापौर सकाळी २ तास घेतात योगा

कोरोनाला दूर सारण्यासाठी रोग प्रतिकारक क्षमता वाढविणे आवश्यक आहे. रुग्णांसाठी महापौर सौ.भारती सोनवणे व योगशिक्षिका हेमांगिनी सोनवणे या सकाळीच ६.३० वाजता कोविड केअर सेंटरला पोहचतात. सर्व पॉझिटिव्ह रुग्णांना इमारतीच्या गॅलरीत तसेच विलगीकरण केलेल्या व्यक्तींना खोलीच्या खिडकीत उभे राहण्यास सांगण्यात येते. महापौर भारती सोनवणे आणि योगशिक्षिका हेमांगिनी सोनवणे माईकद्वारे योगाविषयी सूचना देतात.

 

६ प्रकारच्या योगाचे प्रशिक्षण

रोगप्रतिकारक क्षमता वाढावी आणि श्वसनसंस्था मजबूत होऊन शरीरात अधिकाअधिक प्राणवायूचा संचार व्हावा यासाठी महापौर सौ.भारती सोनवणे व योगशिक्षिका हेमांगिनी सोनवणे रुग्णांकडून ६ प्रकारचा योगा करवून घेतात. त्यात ओंकार, दीर्घ श्वसन, अनुलोम विलोम, भ्रमर, कपालभाती, भसरीका या योगप्रकारांचा समावेश असतो.

 

जागतिक योग दिवस साजरा

एरव्ही कुणीही कोविड केअर सेंटरकडे फिरकत नसताना दोन्ही योगशिक्षिका कोरोना रुग्णांना इमारतीत जाऊन प्रशिक्षण देतात. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र जागतिक योग दिवस ऑनलाईन साजरा करण्यात आला. महापौर सौ.भारती सोनवणे आणि योगशिक्षिका हेमांगिनी सोनवणे यांनी मात्र कोरोना पॉझिटिव्ह व विलगीकरण केलेल्या रुग्णांसोबत जागतिक योग दिवस साजरा केला. सर्वांना योगाचे महत्त्व पटवून देत घरी दररोज योगा करावा असे आवाहन त्यांनी केले.

Protected Content