कोरोना रुग्णांची संख्या देशात ६६ लाखांच्या पुढे

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । आरोग्य मंत्रालयाकडून भारतात गेल्या २४ तासांत नोंदविण्यात आलेली कोविड-१९ रुग्णांची आकडेवारी जाहीर करण्यात आलीय. देशातील एकूण रुग्णांची आकडेवारी ६६ लाखांच्या पुढे गेलीय. एका दिवसात जवळपास ७५ हजार नवीन संक्रमित रुग्ण आढळलेत.

रविवारी कोविड-१९ चे ७४ हजार ४४२ रुग्ण आढळले. त्यामुळे देशात आत्तापर्यंत संक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या रुग्णांची संख्या ६६ लाख २३ हजार ८१५ वर पोहचलीय.

दिलासादायक म्हणजे गेल्या २४ तासांत ७६ हजार ७३७ रुग्ण बरे झाले आहेत. हा आकडा याच वेळेत दाखल झालेल्या रुग्णांच्या आकड्यात तुलनेत अधिक आहे.

देशात आत्तापर्यंत ५५ लाख ८६ हजार ७०३ रुग्णांनी मात केलीय. सध्या ९ लाख ३४ हजार ४२७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशातील रिकव्हरी रेट (रुग्ण बरे होण्याचं प्रमाण) ८४.३४ टक्के आहे. ‘अॅक्टिव्ह रुग्ण’ दर (उपचार सुरू असलेल्या रुग्णांची संख्या) १४.१ टक्के तर मृत्यू दर १.५५ टक्के आहे. पॉझिटिव्हिटी रेट (एकूण टेस्टमध्ये संक्रमित आढळलेल्या रुग्णांची संख्या) ७.५२ टक्क्यांवर आहे.

गेल्या २४ तासात देशात ९ लाख ८९ हजार ८६० टेस्ट पार पडल्या. देशात एव्हाना ७ कोटी ९९ लाख ८२ हजार ३९४ नमुन्यांची चाचणी करण्यात आलीय. जगभरातील आकडेवारीवर नजर टाकली तर, टेस्टिंगमध्ये भारत अमेरिकेनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Protected Content