जळगाव, प्रतिनिधी । कोविड सेंटरमध्ये दाखल झालेला प्रत्येक रुग्ण लवकरात लवकर पुर्णपणे बरा होऊन त्याच्या कुटुंबियांमध्ये आपल्याला आनंद निर्माण करता यावा. यास सर्व कोविड सेंटरच्या डॉक्टरांचे प्राधान्य असणे आवश्यक आहे. त्यासाठी कोविड सेंटरच्या सर्व डॉक्टरांनी दररोज सायंकाळी नियमितपणे व्हिडीओ कॉन्फरसिंगच्या माध्यमांतून एकमेकांशी संवाद साधावा. तसेच कोविड सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांबाबत काय खबरदारी घेणे आवश्यक आहे. याची माहिती घेऊन पुढील उपचारासंबंधी योग्य ती पाऊले उचलावीत. अशा सूचना जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिल्यात.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. आरोग्य विभागाकडून घरोघरी जावून संशयितांची शोध मोहिम राबविण्यात येत आहे. संशियत आणि पॉझिटिव्ह रुग्णांवर जिल्ह्यातील विविध कोविड सेंटरमध्ये आवश्यक ते उपचार सुरु आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त जिल्हास्तरीय समन्वय समिती व नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी श्री. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी त्यांनी आरोग्य विभागाच्या यंत्रणांसह सर्व संबंधितांना वरील सुचना केल्या.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी. एन पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ.पंजाबराव उगले, महानपालिकेचे आयुक्त सतिष कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अप्पर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप पाटोडे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा पुरवठा अधिकारी सुनिल सुर्यवंशी आदि उपस्थित होते. जिल्हाधिकारी अभिजित राऊत पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूचा प्रार्दुभावासह मृत्यूदर रोखण्यासाठी स्वॅब तपासणी अहवाल 24 तासात प्राप्त होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ते नियोजन करावे.
बैठकीस उपस्थित जिल्हा शल्य चिकित्सक, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता यांनी मनुष्यबळ, साधनसामुग्रीबाबत उपस्थित केलेल्या अडचणींवर लवकरच योग्य तो मार्ग काढण्यात येईल. असे सांगून सकारात्मक आणि सांघिक प्रयत्नांतून कोरोना विषाणूला आपण जिल्ह्यातून हद्दपार करू असा विश्वास यावेळी जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केला. कोरोना कक्षात 24 तास आरोग्य सेवा अविरतपणे कार्यरत असणे आवश्यक असून सर्व रुग्णांना आवश्यक त्या सोयी-सुविधा मिळणे हा त्या रुग्णांचा मुलभुत अधिकार आहे. त्यापासून एकही रुग्ण वंचित राहता कामा नये, तसेच कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांनी कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्यक्ष कोरोना कक्षात जावून आपल्या आप्तजनांची भेट घेणे टाळावे. तसेच आरोग्य प्रशासनाने नातेवाईकांना त्यांच्या कोरोना बाधित रुग्णांशी संवाद साधण्यासाठी दिवसातून किमान दोन वेळा निश्चित करून व्हिडिओ कॉलद्वारे त्यांचा संवाद घडवून आणावा. त्यात कुठेही उणिवा भासता कामा नये तसेच समन्वयाची कमी सुध्दा आढळता कामा नये. असेही जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी शेवटी सर्व यंत्रणांना उद्देशून सांगितले.
प्रारंभी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नियुक्त नोडल अधिकारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.एन.एस.चव्हाण, महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी प्रविण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील या सर्वांनी आप-आपल्या विभागाने आतापर्यंत कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या विविध उपाययोजना आणि केलेल्या कामाचा लेखाजोखा जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केला.
यानंतर जिल्हाधिकारी श्री. राऊत यांनी कोविड रूग्णालयास भेट दिली. तेथील कामकाजाची तसेच रूग्णांवर करण्यात येत असलेले उपचार व औषधी आवश्यक त्या सोईसुविधा, आदिची पाहणी केली. तसेच अधिष्ठाता, डॉक्टर यांचेशी चर्चा करून कोरोना संसर्ग कक्ष व रूग्णालय परिसराची पाहणी केली. व आवश्यक त्या सुचनाही केल्या. यावेळी प्रशासक डॉ. पाटील, अधिष्ठाता डॉ. रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण, नोडल अधिकारी श्री. लोखंडे यांचेसह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.