कोरोना मृत्यू प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो छापा — नवाब मलिक

 

 

मुंबई : वृत्तसंस्था । कोरोना लसीकरन प्रमाणपत्रावर पंतप्रधान मोदीचा फोटो छापला. आमची मागणी आहे की, कोरोना मृत्यू प्रमाणपत्रांवरही त्यानाच फोटो हवा. ते लसीकरणाचं श्रेय घेत असतील, तर त्यांनी मृत्यूची जबाबदारीही घ्यावी,” अशा शब्दात अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे.

 

 

केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील ठाकरे सरकार यांच्यात विविध मुद्द्यांवरून सातत्यानं शाब्दिक चकमकी झडताना दिसत आहे. लसींच्या पुरवठ्यावरून सुरू झालेल्या आरोप प्रत्यारोपांची धूळ खाली बसत नाही, तोच पुन्हा एक वाद उभा राहिला आहे. राज्यात रेमडेसिवीरचा तुटवडा असून, यावरून राज्य सरकारने केंद्रावर धक्कादायक आरोप केले. हे आरोप करतानाच राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पंतप्रधान मोदींना टोलाही लगावला.

 

रेमडेसिवीर इंजेक्शनसंदर्भात मोदी सरकार महाराष्ट्राशी दुजाभाव करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला. “केंद्र सरकारकडून रेमडेसिवीर निर्यातीवर बंदी घातली गेल्याने भारतातील १६ निर्यातदारांना स्वतःकडे असलेल्या २० लाख रेमडेसिवीरचे इंजेक्शन विकायला परवानगी मिळत नाहीये. केंद्र सरकार त्यास नकार देत आहेत. राज्य सरकारने १६ कंपन्यांकडे विचारणा केली असता त्यांनी केंद्राने महाराष्ट्राला औषधी देण्यास नकार दिला असल्याचं सांगितलं. हे खेदजनक  आहे,” असं मलिक म्हणाले.

 

देशातील  परिस्थितीवरून मलिक यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली. “देशातील रुग्णसंख्या वाढत आहे. मृतांचा आकडाही वाढत आहे. अंत्यसंस्कार करण्यासाठी स्मशानभूमींमध्ये जागा नाही. लोकांना रांगा लावाव्या लागत आहे, असे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. देशात ही जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्याला केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्राने उत्तर द्यावं, पळ काढू नये , असेही ते म्हणाले

Protected Content