मुंबई (वृत्तसंस्था) कोविड-१९ साठी लस १५ ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा आयसीएमआरचा दावा अवास्तव आहे. लॉकडाउनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापीटा आहे का?, असा प्रश्न काँग्रेस नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
पुणे येथील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी व भारत बायोटेक यांच्या सहकार्याने तयार होत असलेल्या कोव्हॅक्सिनच्या माणसांवरील चाचण्या ७ जुलैपासून सुरू कराव्यात असे पत्र आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव यांनी संबंधित बारा संस्थांना पाठविले आहे. नेमक्या याच मुद्द्यावरून आयसीएमआरचा हा दावा अवास्तव असल्याचे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. भारत बायोटेकने करोनावरील लस तयार केल्याची सोमवारी घोषणा केली होती. त्यावर पृथ्वीराज चव्हाण यांनी ट्वीट केले आहे की, कोव्हीड-१९ साठी लस १५ ऑगस्ट पर्यंत तयार होईल हा #ICMR चा दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था, गलवान खोऱ्यातील नामुष्की या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी यासाठी हा आटापिटा आहे का? आरोग्य मंत्र्यांनी स्पष्टीकरण केले पाहीजे.