पुणे वृत्तसंस्था । जिल्ह्यात दिवसभरात ५५० नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी ४४४ रुग्ण हे पुणे शहरात आढळून आले आहेत. जिल्ह्यात आता कोरोना रुग्णांची संख्या १३ हजार २३५ वर पोहोचली आहे.
कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येने प्रशासनाची चिंता वाढली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासन अनेक प्रयत्न करत आहेत. पुणे जिल्ह्यात दिवसभरात १५ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५५३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर काल दिवसभरात ११७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. पुण्यात कोरोना रुग्णांचा मृत्यूदर ९.६ टक्क्यांवरुन ४.५ टक्क्यांवर घसरला आहे.
पुण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र, रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी वाढवण्यात आणि मृत्यूदर कमी करण्यात पालिका प्रशासनाला यश आले आहे. त्यामुळे पुणे खुलं केल्यानंतरही परिस्थिती नियंत्रणात आहे, असा दावा काहीदिवसांपूर्वी आयुक्त शेखर गायकवाड यांनी केला होता. त्यासोबत जून अखेर अॅक्टिव्ह रुग्ण ६ हजारांवर पोहचल्याचेही आयुक्तांनी सांगितले.