जामनेर प्रतिनिधी । कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील गोराडखेडा येथे केंद्रीय पथकाकडून सर्वेक्षण करण्यात येणार आहे. राज्यातील इतर जिल्ह्यातील सर्वेक्षण करून पथक उद्या जळगाव जिल्ह्यात दाखल होणार आहे. १८ ते २२ मे दरम्यान जिल्ह्यातील विविध गावांमध्ये जावून सर्वेक्षण करणार आहे.
देशात विषाणू तपासणी व संशोधनाचे कार्य करणाऱ्या पुणे येथील इंडीयन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च ही संस्था सदर सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणात रॅपिड टेस्ट होणार आहे. येथून सॅम्पल पुणे येथील नॅशनल व्हायरॉलॉजी लॅबला पाठवण्यात येणार असून नंतर त्याचा अहवाल केंद्र सरकारला देण्यात येणार आहे. यासाठी जिल्हास्तरावरून 20 गाड्या, आवश्यक सहाय्यक अधिकारी व कर्मचारी वर्ग, पी.पी.ई. किट व आवश्यक साधन सामुग्री सदर टीमला पुरवण्यात येणार आहे. तहसीलदार यांच्याकडून पुरेसे पोलीस संरक्षण, आवश्यक सहाय्यक अधिकारी व कर्मचारी पुरवण्यात येणार आहे. गटविकास अधिकारी यांच्यासह सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी सर्वेक्षणाच्या दिवशी गावात उपस्थित राहणार आहे. सदर गावासाठी रवींद्र सूर्यवंशी यांची पथक प्रमुख म्हणून तालुकास्तरावरून नेमणूक करण्यात आली आहे.
या पार्श्वभूमीवर तालुका स्तरीय टीमने सदर गावाला भेट देऊन सर्वेक्षणाबाबत नागरिकांचे समुपदेशन केले व कोरोना आजार ब प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत सविस्तर माहिती देण्यात आली. टीममध्ये तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे, डॉ.पल्लवी राऊत, डॉ.मनोज तेली, बशीर पिंजारी, एस.पी.नागरगोजे, सुशीला चौधरी, बी.के.साळुंके, एम.एस.परदेशी गावातील आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस उपस्थित होते. याप्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.