यावल प्रतिनिधी | कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या मुलांना दीपस्तंभ फाऊंडेशनतर्फे मोफत करियर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.
याबाबत वृत्त असे की, गत दिड वर्षाच्या काळात कोरोनाने घातलेल्या थैमानामुळे दुदैवा आपली दोन्ही पालक दगावलेल्या मुलांसाठी महिला व बाल विकास विभाग -महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत १८ वर्षाखालील मुला-मुलींसाठी काही योजना राबविल्या जात आहेत आणि ह्या योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची जबाबदारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून अशा अनाथ झालेल्या मुलांचा शोध घेणे, त्यांना या योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी संबंधित यंत्रणा,आरोग्य विभाग,प्रसार माध्यमे,स्वतःची शोध पथके या सर्वांच्या माध्यमातून या सर्व पीडित (अनाथ) बालकांचा शोध घेतला.एवढेच नव्हे तर या शासकीय योजने सोबत ह्या १८वर्षाखालील निरागस बालकांना या दुःखातून आणि वेदनेतून बाहेर काढण्यासाठी त्यांनी दीपस्तंभ (मनोबल) या संस्थेशी संपर्क केला.
या अनुषंगाने संबंधीत सर्व अनाथ मुलांचे माध्यमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण होण्यासाठी तसेच त्यांना भविष्यातील करिअरच्या संधी व शालेय स्तरीय स्पर्धा परीक्षा यांचे मार्गदर्शन दीपस्तंभ च्या माध्यमातून वेळोवेळी कसे उपलब्ध करून देता येईल यासाठी त्यांनी शासकीय योजनांची सर्व संबंधित कागदपत्र एकाच वेळेत आणि एकाच ठिकाणी पूर्ण करून घेता यावीत यासाठी त्यांनी एक स्वतंत्र यंत्रणा कार्यालयात सुरू केली आहे. या पीडित बालकांना बँकेच्या खात्यासाठी वणवण फिरावं लागू नये म्हणून बँकेचे संबंधित कर्मचारी देखील खाते उघडण्यासाठी आपल्याच कार्यालयात बोलावून घेतले.
म्हणजेच कोणत्याच कामासाठी या अनाथ ,पीडित बालकांना शासकीय कार्यालयाच्या फेर्या मारण्याची गरज पडू नये याची दक्षता विजयसिंह परदेशी घेताना दिसतात.शासकीय लाभ मिळवून देणे ,योजनेची अंमलबजावणी करणे हे त्यांचे कर्तव्यच हे मी समजू शकतो , परंतु त्यापुढे जाऊन त्यांनी मुलांच्या मानसिकतेचा आणि त्यांच्या वेदनेचा सर्वार्थाने विचार करून त्यावर फुंकर घालण्यासाठी जे जे काही करता येइल ते सर्व करण्याचा आमचा प्रयत्न कटाक्षाने राहील अशी माहीती त्यांनी डांभुर्णी तालुका यावल येथील संदीप पाटील यांच्या दिपस्तंभ फाउंडेशन आणी स्वयंदीप प्रतिष्ठानच्या भेटी दरम्यान दिली.