कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तींशी महापौरांनी साधला संवाद !

 

जळगाव (प्रतिनिधी) शहरातील कोरोना पॉझिटिव्ह आणि हाय रिस्क असलेल्या व्यक्तींना शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात क्वारंटाइन करण्यात आले आहे. जळगावातील ६ महिला मंगळवारी कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले, यावेळी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि टाळ्या वाजवून त्यांना निरोप दिला.

 

जळगाव शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी मनपा प्रशासनाकडून योग्य खबरदारी घेण्यात येत आहे. शहरातील कोरोना पॉझिटिव्ह असलेल्या नो सिमप्टमॅटिक रुग्णांना आणि त्यांच्या संपर्कातील हाय रिस्क असलेल्या व्यक्तींची व्यवस्था मनपा प्रशासनाकडून शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वसतिगृहात करण्यात आली आहे. बुधवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्याठिकाणी पुन्हा भेट देऊन आढावा घेतला. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, बंटी जोशी, चेतन सनकत, नितीन तायडे, बाळासाहेब चव्हाण यांच्यासह मनपाचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

कोरोनामुक्त रुग्णांशी साधला संवाद

जळगाव शहरातील ३ आणि परिसरातील ३ अशा ६ महिला कोरोनामुक्त झाल्याने त्यांना बुधवारी सुट्टी देण्यात आली. महापौर सौ.भारती सोनवणे यांनी त्यांच्याशी संवाद साधत यापुढे देखील घाबरून न जाता स्वतःची आणि परिवाराची काळजी घ्यावी, असे आवाहन केले. तसेच पुढे कोरोना योद्धा म्हणून नागरिकांना खबरदारी घेण्यासाठी जागरूक करावे असेही त्यांनी सांगितले. कोरोनामुक्त झालेल्या महिलांना महापौरांसह सर्वांनी टाळ्या वाजवून निरोप दिला.

 

नियमीत स्वच्छता ठेवा : महापौर

कोरोना कक्ष आणि क्वारंटाइन कक्षातील रुग्णांशी मी दररोज फोनद्वारे संवाद साधत असल्याने त्यांना जाणवत असलेल्या असुविधांबद्दल माहिती होते. रुग्णांचे कक्ष नियमीत निर्जंतुक करणे, शौचालयांची स्वच्छता ठेवण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. सफाई कर्मचाऱ्यांनी आपले काम प्रामाणिकपणे करताना स्वतःच्या आरोग्याचे देखील भान ठेवावे, असेही महापौर सौ.भारती सोनवणे यांनी आवाहन केले आहे.

 

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे


जळगाव मनपाचे सर्व वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आशा सेविका, मलेरिया, साफसफाई विभाग जीव धोक्यात घालून कोरोनामुक्त जळगाव शहर साकारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. एखाद्या परिसरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यानंतर त्या सर्वांचीच मोठी धावपळ होते. अशा परिस्थितीत काही नागरिक सहकार्य करीत नसल्याची तक्रार येत आहे. मनपा प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आपल्या हितासाठीच असून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापौर सौ.भारती सोनवणे यांनी केले आहे.

Protected Content