नवी दिल्ली वृत्तसंस्था । एकीकडे भारतासह संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या मगरमिठीतून सुटका करून घेण्याच्या प्रयत्नांत असताना, दुसरीकडे चीनच्या आणखी एका विषाणूचा धोका भारत आणि जगावर घोंघावू लागला आहे. चीनमधील कॅट क्यू हा विषाणू भारतात केव्हाही दाखल होऊ शकतो, असा इशारा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने केंद्र सरकारला दिला आहे. हा विषाणू मनुष्याला तापाचा आजार , मेनिन्जायटीस आणि मुलांमध्ये इन्सेफलाइटिसची समस्या निर्माण करतो,
चीन आणि व्हिएतनाममध्ये कॅट क्यू या विषाणूचे अस्तित्व असल्याचे आयसीएमआरच्या पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या सात संशोधकांच्या हवाल्याने म्हटले गेले आहे. हा विषाणू डासांमध्ये आणि डुकरांमध्ये आढळला आहे. भारतात देखील क्यूलेक्स डासांमध्ये कॅट क्यू विषाणूसारखे काही आढळले असल्याचे संस्थेने म्हटले आहे.
सीक्यूव्ही मुळात डुकरांमध्येच आढळतो आणि चीनमधील पाळीव डुकरांमध्ये या विषाणूविरोधातील अँटीबॉडीज आढळले असल्याचे संस्थेने म्हटले आहे. याचाच अर्थ कॅट क्यू या विषाणूने चीनमध्ये स्थानिक स्तरावर प्रभाव पाडणे सुरू केले आहे.
संशोधकांनी देशातील विविध राज्यांमधून एकूण ८८३ नमुने गोळा केले. त्यांपैकी दोन नमुन्यांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या. दोन जणांना एकाच वेळी संसर्ग झाल्याचेही आढळून आले आहे. मानवांच्या सीरम नमुन्यांच्या तपासणीत अँटी-सीक्यूव्ही आयजीजी अँटीबॉडी आढळणे आणि डासांमधील सीक्यूव्हीच्या रेप्लकेशन क्षमतेवरून हे स्पष्ट होते की, भारतात या विषाणूचा आजार पसरू शकतो, असे इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्चमध्ये जून महिन्यात प्रकाशित झालेल्या एका संशोधनात म्हटले आहे. अशात मानव आणि डुकरांंची तसेच सीरम नमुन्यांची तपासणी करणे आवश्यक असून त्याद्वारे हा विषाणू आधीपासूनच आमच्यात अस्तित्वात होता का हे समजू शकणार आहे.
भारताचा विचार करता आकड्यांवरून काही डास सीक्यीव्हीबाबत संवेदनशील आहेत, असे एका संशोधकाने म्हटले आहे. अशा प्रकारे डास हे सीक्यूव्हीच्या संक्रमणाचे कारण बनू शकतात, असेही संशोधकाला वाटते.