जळगाव, प्रतिनिधी । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सार्वजिनिक नवरात्रौत्सव उत्साहात परंतु साधेपणाने साजरा करुया. असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. येथील जिल्हा नियोजन भवनात सार्वजनिक नवरात्रौत्सवासाठी समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकरी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, यावेळी ते उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे, महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, सचिन गोरे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम लोही, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील आदि उपस्थित होते.
उपस्थितांना मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, सार्वजनिक नवरात्रौत्सव साजरा करतांना मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाच्या सुचनांचे पालन करुन शिस्तीने परंतु उत्साहात साजरा करावा. या उत्साहाच्या माध्यमातून शासनाच्या माझे कुटूंब, माझी जबाबदारी मोहिमेची तसेच कोरोनापासून घ्यावयाच्या काळजीबाबत नागरीकांमध्ये जनजागृती करावी. मंडळाच्या पाच कार्यकर्त्यानी आरती करतांना सामाजिक अंतर पाळले जाईल याची काळजी घ्यावी.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात येत आहे तो वाढू नये याची सर्वांनी खबरदारी घ्यावी. उत्सावाच्या माध्यमातून जातीयसलोखा निर्माण होण्याबरोबरच बंधुभावाची भावना निर्माण व्हावी अशा पध्दतीने उत्सव साजरा करावा.जळगाव जिल्ह्यातील सर्व मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचे सामाजिक उपक्रमात चांगले योगदान आहे. ते या उत्सवातही पुढे सुरु राहील. वर्गणीसाठी मंडळांनी नागरीकांना जबरदस्ती करु नये. या उत्सावात मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरांचे आयेाजन करुन सामाजिक बांधिलकी जपण्याचे आवाहन जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी केले.
सार्वजनिक मंडळाना परवानगीसाठी त्रास होवू नये याकरीता सर्व पोलीस स्टेशनमध्ये एक खिडकी योजना राबविण्यात येईल्. याठिकाणी त्यांना आवश्यक त्या परवानग्या उपलब्ध करुन दिल्या जातील. मूर्ती संकलनासाठी केंद्र उभारण्यात येतील. त्यास सार्वजनिक मंडळांनी सहकार्य करावे, विर्सजनासाठी मेहरुण तलावाजवळ आवश्यक त्या सुविधा उपलबध केल्या जातील अशी माहिती महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांनी दिली.
शासन नियमांची माहिती देतांना निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील म्हणाले की, परवानगीशिवाय मंडळांना मंडप टाकता येणार नाही. त्यामुळे आवश्यक त्या परवानग्या विहित वेळेत घ्याव्यात. कोरानामुळे यावर्षी आगमन व विसर्जन मिरणवणूकीसाठी प्रतिबंध करण्यात आला आहे. त्यामुळे मिरवणूका काढता येणार नाही. गरबा, दांडियांचे कार्यक्रम आयेाजित करता येणार नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी मंडळांनी घ्यावी. मंडपाजवळ सॅनिटायझर ठेवावे, सामाजिक अंतर राखले जाईल याची दक्षता घ्यावी. शक्यतो दर्शनाची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करुन द्यावी. यावेळी सामाजिक कार्यकर्ते व मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी उपयुक्त सुचना मांडल्यात.
या बैठकीस उपविभागीय अधिकारी प्रसाद मते, राजेंद्र कचरे, विनय गोसावी, श्री. साताळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी ईश्वर कातकाडे यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी, तहसीलदार, सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी, विविध मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.