रिओ दि जेनेरियो: वृत्तसंस्था । कोरोनासारखा भ्रष्टाचारही वाढतो आहे. सरकारकडून येणाऱ्या निधीवर डल्ला मारला जात असून ब्राझीलचे लोकप्रतिनिधीही सामिल असल्याचा आरोप आहे . भ्रष्टाचारविरोधी पथकाने टाकलेल्या छाप्यात एका खासदाराच्या अंतर्वस्त्रातून लाखो रुपये जप्त केले.
ब्राझीलमधील भ्रष्टाचारविरोधी पथकाने राष्ट्रपती जॅर बोल्सनारो यांच्या पक्षाच्या चिको रॉड्रिग्स या खासदाराच्या घरावर छापा मारला. चिको रॉड्रिग्स यांच्याविरोधात मोठ्या प्रमाणावर तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. रोरिमा राज्यासाठी सरकारने निधी पुरवला होता. मात्र, चिको रॉड्रिग्स यांनी या निधीवर डल्ला मारला असल्याचा आरोप करण्यात आला. अखेर त्यांच्या घरावर छापा मारण्यात आला.
भ्रष्टाचारविरोधी पथकातील अधिकाऱ्याने सांगितले की, त्यांच्या अतंर्वस्त्रातून ३० हजार ब्राझिलियन रिअल (जवळपास तीन लाख ८८ हजार रुपये) जप्त करण्यात आले. त्यांनी छापेमारी दरम्यान हे पैसे लपवले होते.
खासदार चिको रॉड्रिग्स यांनी या छापेमारीनंतर एक निवदेन प्रसिद्ध केले आहे. मात्र, त्यांनी घरात सापडलेल्या नोटांबाबत भाष्यही केले नाही. चिको रॉड्रिग्स यांनी सांगितले की आपण कोणतेही काम चुकीचे केलेले नाही. माझ्या बदनामी हा कट असल्याचेही त्यांनी म्हटले.
राष्ट्रपती जॅर बोल्सनारो यांनी खापर माध्यमांवर फोडले आहे. आमचे सरकार भ्रष्ट असल्याचे दाखवण्यासाठी माध्यमांनी ही खोटी कथा रचली असल्याचे त्यांनी सांगितले. याउलट आमचं सरकार भ्रष्टाचाराविरोधात कडक पावले उचलत असल्याचे या छाप्यातून समोर आले असल्याचे त्यांनी म्हटले. आम्ही कोणताच प्रकारचा भ्रष्टाचार खपवून घेणार नसल्याचे त्यांनी सांगितले.