कोरोनाचा जैविक अस्त्र म्हणून वापर : इसीसने आखला होता कट !

नवी दिल्ली वृत्तसंस्था । कोरोनाचा जैविक अस्त्र म्हणून वापर करण्याचा कट इसीसने आखला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात ही बाब नमूद करण्यात आली आहे.

सध्या कोरोनामुळे जगभरात हाहाकार सुरू असतांना दहशतवादी संघटना याचा जैविक अस्त्र म्हणून वापर करण्याच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

करोना साथीच्या काळात दहशतवादी संघटना आपल्या विचारांचा प्रसार आणि निधी संकलानात गुंतल्या आहेत. करोनामुळे लादलेले निर्बंध उठल्यानंतर दहशतवादी संघटना पुन्हा हल्ला करण्याची शक्यता आहे, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालात देण्यात आला आहे. करोनामुळे जागतिक मंदीची स्थिती आली आहे. त्यातच दहशतवादाला रोखण्यासाठी करावयाच्या खर्चाची डोकेदुखी त्यामुळे वाढणार आहे. लॉकडाऊनच्या काळात इसिसने आपला संभाव्य दहशतवाद्यांचा शोध घेण्याचे काम केले आहे. अनेक देशांतून त्यांनी ही मोहीम राबवली होती.

करोनाच्या लॉकडाऊनचा इसिस, अल कायदा आणि त्यांच्या संबंधित संघटनांच्या कामकाजावर संघर्ष क्षेत्र आणि संघर्ष सुरू नसलेल्या क्षेत्रात झालेला परिणाम वेगवेगळा आहे. साथीमुळे सैन्याचे अन्यत्र लक्ष वेधले गेल्याचा फायदा दहशतवादी संघटना उठवत आहेत. सार्वजनिक आरोग्यासाठी संघर्ष क्षेत्रात निर्बंध लादले गेले नाहीत. त्यामुळे तेथे दहशतवादी कृत्यांची शक्यता वाढली असून संघर्षहीन क्षेत्रात ती कमी झाल्याचे या अहवालात नमूद केले आहे. कोरोना विषाणूचा शस्त्र म्हणून वापर करायची योजना इसिसने आखली होती. मात्र त्यात त्यांना यश मिळाले नाही. असा वापर झाल्याचे कोणत्याही देशाने म्हटले नाही. इसिस आणि अल कायदा सारख्या संघटना अन्य संघटनांकडून केल्या जाणार्‍या प्रचारचा आधार घेत असतात, असे या अहवालात म्हटले आहे.

करोनामुळे आंतराष्ट्रीय प्रवासावर निर्बंध लादले असल्याने दहशतवादी संघटनांच्या निधी पुरवठ्यावर निर्बंध आले आहेत. त्याचबरोबर त्यांची हालचाल आणि जाळे विस्तारण्यावरही मर्यादा आल्या आहेत. सार्वजनिक कार्यक्रम बंद असल्याने दसहशतवादी कृत्ये करण्यास फार वाव राहिला नाही असे त्यात म्हटले आहे.

Protected Content