कोपरगाव अनिल राणे । कोपरगाव शहरात ४० वर्षीय महिला कोरोना बाधित आढळून आल्याने ज्या भागात ही महिला राहत होती, तो संपूर्ण परिसर रात्रीच सील करण्यात आला असून बाधित महिलेच्या संपर्कातील सर्वांचे स्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे तहसीलदार योगेशचंद्रे यांनी ‘लाईव्ह ट्रेन्डस् न्यूज’ सांगितले.
या बाधित महिलेच्या संपर्कातील जवळपास ३० व्यक्तींच्या अहवालाकडे आता कोपरगावकरांचे लक्ष लागून आहे. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चिंता वाढली आहे.
कोपरगाव शहरातील अत्यंत नामवंत विद्यालयातील कोरोना बाधित कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 13 व्यक्तींपैकी कोपरगाव शहरातील मध्यवर्ती बजाज बिल्डींग सेवानिकेतन रोड या भागातील एक चाळीस वर्षीय महिला गुरुवार ४ जून २०२० रोजी कोरोना बाधित असल्याचा अहवाल सायंकाळी प्रशासनास प्राप्त झाला, त्या पार्श्वभूमीवर रात्रीच महसूल प्रशासन, नगरपालिका प्रशासन पोलिस प्रशासन आणि आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी ज्या परिसरात ही बाधित महिला राहत होती, त्या परिसरात आपल्या फौजफाट्यासह दाखल होवून या बाधित महिलेला ताब्यात घेवून पुढील उपचारासाठी डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आत्मामालिक येथे पाठविण्यात आले आहे. या घटनेमुळे चिंतेचे एकच वातावरण पसरले आहे. दरम्यान रस्त्यावर लोकांची, वाहनधारकांची गर्दी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. संपूर्ण परिसर प्रशासनाच्यावतीने सील करण्यात आला आहे. तसेच या संपूर्ण परिसरात कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांच्या सूचनेनुसार हात पंप व अग्निशामक दलाच्या गाडीमार्फत सोडियम हायपो क्लोराईडची फवारणी करून निर्जंतुकीकरण करण्यात आले. श्री. सरोदे हे आधी सावदा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी होते. एक शिस्तबद्ध अधिकारी म्हणून त्यांचा कोपरगाव येथेही वचक त्यांनी निर्माण केला आहे. कोपरगावच्या कोरोना बाधीत व्यक्तीच्या परिसरात राहणाऱ्या सर्व नागरिकांची आरोग्य विभागातील परिचारिका कर्मचारी, आशा कर्मचाऱ्यांची पथके तयार करून थर्मामिटर तसेच ऑक्सिमीटरच्या सहाह्याने तपासणी करण्याचे काम जोरात सुरु करण्यात आले आहे. कंटेनमेंट झोन व बफर झोनकरीता मुख्याधिकारी प्रशांत सरोदे हे सनियंत्रण अधिकारी म्हणून ४ जून ते १७ जून पर्यंत कामकाज पाहणार आहेत. ज्या भागात ही महिला राहत होती, त्या भागापासून आजूबाजूचा संपूर्ण परिसर ‘कंटेनमेंट झोन’ म्हणून सील केला असून या झोनमध्ये कोणत्याही प्रकारच्या अत्यावश्यक सेवा चालू राहणार नाहीत त्याचप्रमाणे इतर प्रतिष्ठाने ही बंद राहतील. कोणत्याही प्रकारची जनरल व इतर दुकाने चालू राहणार नाहीत तसेच या भागातील नागरिकांना ‘ कंटेनमेंट झोन ‘ मधून बाहेर जाता येणार नाही किंवा बाहेरील व्यक्तींना आतमध्ये प्रवेश नाही. कंटेनमेंट झोनच्या बाहेर असलेल्या बफर झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु राहतील. त्या व्यतिरिक्त इतर सर्व दुकाने बंद राहणार असल्याचे यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे यांनी सांगितले. दिवसेंदिवस कोरोना बाधितांची संख्या ही वाढतच आहे. नागरिकांनी खबरदारी घ्या, विनाकारण घराच्या बाहेर फिरू नये, गर्दी करू नये तसेच बाहेरून जर कोणी नवीन व्यक्ती आला तर तात्काळ प्रशासनाला कळवावे असेही कळविण्यात आले आहे.