Home प्रशासन मंत्रालय कोकणासाठी मदतीचा निर्णय दोन दिवसात — मुख्यमंत्री

कोकणासाठी मदतीचा निर्णय दोन दिवसात — मुख्यमंत्री


 

 

रत्नागिरी : वृत्तसंस्था । तौते चक्रीवादळाचा फटका बसलेल्या कोकणाला दोन दिवसांत पंचनामे पूर्ण करुन मदत जाहीर केली जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलं आहे.

 

 

नुकसानाची पाहणी करण्यासाठी कोकणात दाखल झालेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रत्नागिरीत आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. कोरोना संकट असताना त्यात तौते चक्रीवादळाने भर टाकली आहे. शेवटी वाऱ्याचा वेग आणि पावसाचा जोर यावर नुकसान अवलंबून असतं. दुर्दैवाने काही मृत्यू झाले आहेत. कोणत्या निकषानुसार मदत करायची हे आढावा घेतल्यानंतर ठरवलं जाईल,” असं सांगितलं.

 

“मदतीचे आदेश तात्काळ देण्यात आले आहेत. पंचनामे येत्या दोन ते तीन दिवसांत पूर्ण होतील, त्याचा अहवाल आल्यानंतर आम्ही मदतीसंबंधी निर्णय घेऊ. कोणीही मदतीपासून वंचित राहणार नाही,” असं आश्वासन उद्धव ठाकरेंनी दिलं आहे. “पॅकेजवर माझा विश्वास नाही, जे गरजेचं आहे ते करणार,” असंही ते म्हणाले. मदतीचे निकष बदलण्यासाठी आपण मोदींसोबत झालेल्या बैठकीत सांगितलं होतं, त्यासंबंधी पुन्हा एकदा त्यांच्याशी बोलणार आहे अशी माहिती यावेळी त्यांनी दिली.

 

 

“वादळात नुकसान झालेल्यांना सरकार नाराज करणार नाही. सरकार त्यांच्यासोबत आहे, जे करता येणं शक्य आहे ते केल्याशिवाय राहणार नाही,” अशी ग्वाही त्यांनी दिली. विरोधक दोन दिवसांपासून कोकणात फिरत असताना मुख्यमंत्री चार तासांचा दौरा करत असल्याच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरेंनी हेलिकॉप्टरमधून पाहणी करुन तर नाही ना गेलो, जमिनीवर उतरलोय सांगत मोदींवर निशाणा साधला. “मी विरोधकांना उत्तर देण्यासाठी आलेलो नाही. माझ्या कोकणवासीयांना दिलासा देण्यासाठी आलो आहे. चार तासांचा दौरा असला तरी फोटोसेशन करण्यासाठी आलेलो नाही,” असंही ते म्हणाले.

 

मोदींनी गुजरातला जाहीर केलेल्या मदतीवर बोलताना, “मी येथील विरोधी पक्ष बोलतो तसा बोलणार नाही. मी जबाबदारीने बोलणार. पंतप्रधान आपल्याकडे आले नसले तरी ते महाराष्ट्रालादेखील व्यवस्थित मदत केल्याशिवाय राहणार नाही,” असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. वादळापासून वाचण्यासाठी कायमची सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, त्यासाठी मदत करावी अशी विनंतीही यावेळी त्यांनी केली.

 


Protected Content

Play sound