कैलास सोनवणे यांनी राजीनामा द्यावा- सुनील महाजन यांची मागणी

जळगाव प्रतिनिधी । याआधी गाळेधारकांना समर्थन देण्यावरून नगरसेवकपदाचा राजीनामा देणारे कैलास सोनवणे यांनी आता वॉटरग्रेस कंपनीला पुन्हा ठेका मिळण्याच्या हालचाली सुरू असल्याने आपल्या पदाचा त्याग करावा अशी मागणी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी केली आहे.

महापालिकेत पुन्हा एकदा वॉटर ग्रेस कंपनीला ठेका मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सर्वपक्षीय बैठकीत भाजप गटनेते भगत बालाणी यांनी याबाबत पक्षाची भूमिका जाहीर केली आहे. या वेळी महापौर भारती सोनवणे व स्वीकृत नगरसेवक कैलास सोनवणे यांनी मात्र वॉटर ग्रेसला यापूर्वीही विरोध होता आणि यापुढेही विरोेध राहील, अशी भूमिका घेतल्याने पेच निर्माण झाला आहे.

या अनुषंगाने महापालिकेतील विरोधीपक्ष नेते सुनील महाजन यांनी कैलास सोनवणेंची राजीनामा देण्याची मागणी केली आहे. या संदर्भात ते म्हणाले की, सोनवणे यांनी आधी एकदा राजीनामा दिला होता. २०१८ मध्ये गाळेधारकांच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात येणार होता. त्यावेळी सुरेशदादा जैन यांच्याकडे गाळेधारकांनी पाठिंब्याची मागणी केली होती. त्यानुसार रमेश जैन यांनी सर्व पदाधिकारी व नगरसेवकांना मोर्चात सहभागी होण्याची सुचना केली. परंतु, तेव्हा स्वीकृत नगरसेवक असलेले कैलास सोनवणे यांनी मोर्चाला समर्थन देणार नसल्याचा पवित्रा घेतला होता. पक्षादेश मानत नसल्याने त्यांना रमेशदादांनी राजीनामा देण्याचे सुचविले होते. यावर कैलास सोनवणे यांनी तात्काळ राजीनामा दिला होता. आता पुन्हा तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. पक्ष व सोनवणेची भूमिका वेगळी आहे. त्यामुळे तत्वांशी कधीही तडजोड न करणार्‍या कैलास सोनवणेंनी भाजपकडून राजीनामा मागण्यापूर्वीच आपला राजीनामा पक्षाकडे द्यावा अशी मागणी सुनील महाजन यांनी केली आहे.

Protected Content