जळगाव प्रतिनिधी । केवळ व्यसनांपाही तो गुन्हेगारीकडे वळला. एक दोन नव्हे तब्बल शंभर गुन्हे केले. दहा वर्ष तुरूंगवासही भोगला. तीनवेळा एमपीडीएची कारवाई झाली. मात्र या सर्वानंतरही तो सुधरलेला नसून कारागृहात बाहेर पडल्यावर त्याच्याकडून नवीन गुन्हा घडतच असतो. पोलिसांच्या डोक्याचा ताप वाढविणार्या गुन्हेगाराचे नाव सुरेश पुंडलिक ठाकरे ३९ रा. कोळीपेळ, जैनाबाद असे आहे. त्याने नुकताच फुले मार्केटमधून जबरदस्तीने साड्या चोरण्याचा शंभरावा गुन्हा केला असून या गुन्ह्यात तो जळगाव कारागृहात आहे.
आई वडील, पत्नी आणि तीन मुले व दोन भाऊ असा संशयित सुरेश ठाकरे याचा परिवार आहे. शिरसोली शिवारात पाझर तलावाजवळ २० बिगे शेती आहे. ती शेती आई वडील करतात. लहान भाऊ लष्करात आहे. सुरेश हा तीन्ही भावामध्ये मोठा आहे. दारु पिण्यासह नशा करण्याची सवय लागली. त्यासाठी कुटुंबांकडून कुठलेही पैसे मिळत नसल्याने या व्यसनांमुळे सुरेश हा गुन्हेगारीकडे वळला. त्याच्याच पावला पाऊल ठेवून त्याचा दोन नंबर चा भाऊ शंकर हा सुध्दा गुन्हेगारीत आला. शंकर हा शनिपेठ पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून हिस्ट्रीशिटर आहे. दोन्ही भावांनी सोबतीनेही काही गुन्हे केले आहेत. गेल्या आठवड्यात सुरेशच्या मोठ्या मुलीचे लग्न झाले.
व्यसनांमुळे बेजार झालेल्या सुरेश ठाकरे याच्या हातून पहिलाच गुन्हा हा खूनाचा घडल्याची पोलिसांच्या दप्तरी नोंद आहे. या गुन्ह्यात दहा वर्षांची शिक्षा भोगली अन् सुरेश कारागृहाबाहेर आला. बाहेर आल्यानंतर सुरेश हा अट्टल गुन्हेगार झाला. मारहाण करुन लुटणे यासह मारहाण, दुचाकी चोरी असे गुन्हे त्याने केले. याप्रकरणी शहरातील रामानंदनगर, तालुका पोलीस स्टेशन, शनिपेठ पोलीस स्टेशन, जिल्हापेठ पोलीस स्टेशन, तसेच शहर पोलीस स्टेशन या पाचही पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल आहेत.
गुन्हा दाखल झाला की, पोलीस तपासात सुरेश ठाकरे यास निष्पन्न करुन अटक करतात. न्यायालयात हजर केले की कारागृहात रवानगी होते. यानंतर जामीनावर बाहेर पडला सुरेश हा नवीन गुन्हा करतो. अशाप्रकारे त्याच्या गुन्हेगारीला कंटाळून त्याच्या विरोधात एमपीडीएची कारवाई करण्यात आली. तब्बल तीन वेळा त्याच्या विरोधात एमपीडीएची कारवाई करण्यात आली. मात्र एमपीडीएची मुदत संपल्यावर शहरात आल्यावर मारहाण चोरी सारखे गुन्हे करत आहेत.