केळी भावात त्वरित हस्तक्षेप करा – आमदार चिमणराव पाटील यांची मागणी

पारोळा, प्रतिनिधी | केळी भावात त्वरित हस्तक्षेप करा, अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल असा इशारा आ. चिमणराव पाटील यांनी राज्याचे कृषिमंत्री , पणनमंत्री यांना पत्राद्वारे दिला आहे.

 

जळगाव जिल्हा हा केळी उत्पादनात अग्रेसर असून जिल्यातील प्रमुख पिक केळी आहे. असे असतांना केळीचे खरेदीदार व्यापारी केळी प्रति क्विंटल १५० ते २५० रुपये दराने खरेदी करीत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे फार मोठे आर्थिक नुकसान होत आहे. केळी उत्पादन खर्च खूप मोठा असतांना १५० ते २५० प्रति क्विंटल भावाने खरेदी व्यापारी करीत आहे. तसेच तोच केळीचा माल किरकोळ विक्रेते २५-३० रुपये डझन दराने विक्री करीत आहेत. त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले आहेत. यास्तव केळी भावात त्वरित हस्तक्षेप करा, अन्यथा शेतकरी उध्वस्त होईल म्हणून केळी उत्पादक शेतकरी व व्यापारी यांची तातडीची बैठक बोलविण्यात यावी व केळी उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देणे कामी कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी आमदार चिमणराव पाटील यांनी राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे, पणनमंत्री बाळासाहेब पाटील, जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे कडे पत्रान्वये केली आहे. तसेच आमदार चिमणराव पाटील याबाबत राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांची १४ डिसेंबर रोजी भेट घेणार आहेत.

Protected Content