डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन भाषण डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार

मुंबई । डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन, भाषण व विचार लवकरच मराठीत डिजिटल स्वरूपात उपलब्ध होणार आहेत. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर चरित्रे साधने प्रकाशन समितीच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड क्र.६ चे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मंत्रालायतील उपमुख्यमंत्री कार्यालयात पार पडले. त्यावेळी डॉ नितीन राऊत यांनी बाबासाहेबांचे लेखन, भाषण व विचार डिजिटल स्वरूपात उपलब्ध व्हावे अशी मागणी केली होती. अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणात मराठीत अनुवाद व डिजिटलायझेशन करण्यास मान्यता देत विशेष बाब म्हणून सर्वोतोपरी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.

राऊत यांनी केलेल्या मागणीला उपमुख्यमंत्री पवार यांनी मान्यता दिल्याने लवकरच बाबासाहेबांचे लेखन व भाषणे मराठीत वाचायला मिळणार असून डिजिटलायझेशनचा मार्गही मोकळा झाला आहे. याचा फायदा महाराष्ट्रातील विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी, वाचकांना व संविधान मानणाऱ्या सामान्य मराठी माणसाला होणार आहे. यावेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर चरित्र साधने प्रकाशन समितीचे अध्यक्ष,  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, सदस्य सचिव डॉ प्रदीप आगलावे, सदस्य व माजी कुलगुरू डॉ भालचंद्र मुणगेकर , सहसंचालक शिक्षण डॉ सोनाली रोडे व इतर मान्यवर सदस्य ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

देशाचा, राज्याचा कारभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या राज्य घटनेनुसारच चालला पाहिजे यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी नागरिक म्हणून आपली सर्वांची आहे. बाबासाहेबांचे मूळ भाषण त्यांची कर्मभूमी जन्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात अजून मराठीत होऊ शकलेले नाहीत. मागील सरकारच्या काळात एकही खंड प्रकाशित न झाल्याची खंत यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केली.

डॉ बाबासाहेब यांचे  विचार आपली मातृभाषा  मराठीत उपलब्ध झाल्यास सामान्य मराठी माणसाला विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी तरुणांना बाबासाहेब समजणे फार सोपे होणार आहे, तसेच त्यांना पीएचडी करण्यास मदत होईल. डॉ बाबासाहेब आंबेडकर व तरुण पिढीचा त्यामुळे संवाद घडू शकणार आहे. शाहू, फुले, आंबेडकर यांचे विचार बाजूला ठेवून नको ते विचार आजच्या पिढीपर्यंत काही राजकारणी  देशपातळीवर करत आहेत. ते थांबवण्यासाठी व हाणून पाडण्यासाठी बाबासाहेबांचा विचार युवकांपर्यंत पोहचवायला हवा. डॉ बाबासाहेब आणि तरुण पिढी यांच्यात संवाद झाला तर भारतीय राज्यघटना लोकशाही व त्यावरील विश्वास वाढायला मदत होईल असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला.

बाबासाहेबांनी आपल्या शोध प्रबंधात नेमकी काय भूमिका मांडली, त्यांचे या प्रबंधातील विचार आजही कसे प्रासंगिक आहेत, हे आपल्या मातृभाषेतून समजून घेण्याची संधी यानिमित्ताने मराठी वाचकांना व अभ्यासकांना मिळणार आहे, याचा मला विशेष आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया डॉ नितीन राऊत यांनी यावेळी व्यक्त केली.

 

Protected Content