रावेर प्रतिनिधी । तालुक्यातील केऱ्हाळा खुर्द ते मंगरूळ शेत शिवार रस्त्याचे शेत पाणंद रस्ता योजनेंतर्गत रस्ता मजबुतीकरण करून मिळण्याची मागणी केऱ्हाळा येथील शेतकऱ्यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे .
केऱ्हाळा खुर्द ते मंगरूळ हा शिवरस्ता असून या रस्त्याचा वापर या दोन्ही गावातील शेतकरी कायमस्वरूपी करीत असतात. मात्र या रस्त्यावर काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण केले आहे. हा रस्ता मोकळा करावा यासाठी यापूर्वी ग्रामपंचायतीने ग्रामसभा घेऊन ठराव केलेला आहे. शासनाच्या शेत पाणंद रस्ता योजनेंतर्गत या रस्त्याचे काम करून शेतकऱ्यांना सुविधा मिळावी अशी येथील शेतकऱ्यांनाची रास्त अपेक्षा आहे. तसेच या शिवारात जाण्यासाठी हा प्रमुख रस्ता असल्याने या रस्त्याचा वापर होत असतो. पावसाळ्यात केळी वाहतुकीसाठी शेतकऱ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो . याबाबत केऱ्हाळा दूध डेअरीचे चेअरमन चंद्रकांत पाटील, माजी उपसरपंच राजेंद्र इंगळे, जनार्दन पाटील, श्रीराम पाटील यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या सह्या आहेत . या मागणीचे निवेदन तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना देण्यात आले आहे.