केंद्रीय मंत्रीपदापेक्षा संपादक पद महत्वाचे : संजय राऊत

पुणे प्रतिनिधी | आपण राजकारणात असलो तरी केंद्रीय मंत्री बनावेसे कधीच वाटले नाही. मंत्रीपदापेक्षा आपल्याला सामनाचे संपादक हे पद अधिक महत्वाचे वाटत असल्याचे प्रतिपादन आज खासदार संजय राऊत यांनी केले. पुणे श्रमीक पत्रकार संघातर्फे आयोजीत कार्यक्रमात त्यांनी आज प्रसारमाध्यमे, राजकारण आणि समाजकारणावर भाष्य केले.

 

या कार्यक्रमात खासदार संजय राऊत म्हणाले की, भाषिक वृत्तपत्र देशाचा राज्याचा आधार आहेत. राजकारणात असलो तरी कधी मंत्री व्हावं अस वाटलं नाही. कारण, मला केंद्रीय मंत्री होण्यापेक्षा सामनाचा संपादक असणं महत्वाच होतं. पत्रकारांनी राजकीय पक्षाचे अंकित होता कामा नये. पत्रकारितेत काही पथ्य पाळली पाहिजेत. देशात जे परिवर्तन झालं ते वृत्तपत्रांनी केलं यावर मी ठाम आहे. आता अनेक आव्हानं आहेत. चौथा स्तंभ म्हणता पण त्यांना संसदेत येण्यास नाकारलं जात आहे. यावर कुणी आवाज उठवताना दिसत नाही. यावर पत्रकारांमध्ये एकजूट हवी. भविष्यात असे काही दिसते की राज्यकर्ते माध्यमांना आपल्यासारखं वागवतील आणि ते वाईट आहेत, असंही राऊत म्हणाले.

संजय राऊत पुढे म्हणाले की, कुठल्याही सरकारला आपल्या मर्जीतील वृत्तपत्र नसेल तर ते नको आहे. उत्तर प्रदेशात कोरोनाकाळात मृतदेहांचे फोटो एका वृत्तपत्राने दाखवले. तेव्हा त्याच्यावर आठ दिवसांत धाडी टाकण्यात आल्या. मग त्यावेळी त्यांच्या पाठीशी कोण उभं राहिलं? देशातील मीडिया उद्योजकांच्या हाती जातेय. मात्र, वृत्तपत्रांशिवाय सरकार आणि सरकारशिवाय वृत्तपत्र शक्य नाही. आजची पिढी लिहायला, कागदाला पेन लावायला विसरली आहे. हेच मोठं आव्हान असणार आहे, अशी खंत व्यक्त करतानाच मीडियाला माझ्यामुळे काम मिळतंय. समाजात आणि देशात क्रांती घडवून आणण्याची ताकद वृत्तपत्रात असल्याचा विश्वासही राऊत यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Protected Content