केंद्रानेही शेतकऱ्यांना भरपाईसाठी पुढाकार घ्यावा ; मुक्ताईनगर राष्ट्रवादी युवक पदाधिकाऱ्यांचा फडणवीसांकडे आग्रह

मुक्ताईनगर, प्रतिनिधी ।  राज्याचे  विरोधी पक्ष नेते  ना. देवेंद्र फडणवीस हे आज रावेर-मुक्ताईनगर दौऱ्यावर आले असता त्यांना  राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. पवन  पाटील यांनी केंद्रीय आपत्ती निवारण कक्षातर्फे केळी उत्पादक शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी यासाठी शेमळदे उचंदे परिसरातील शेतकऱ्यांच्या वतीने मागणीचे निवेदन दिले.

निवेदनाचा आशय असा की,  केंद्रीय आपत्ती निवारण कक्षामार्फत केंद्र सरकारने हेक्टरी १ लाख रुपये प्रमाणे नुकसानभरपाई द्यावी.  सततच्या होत असलेल्या नैर्सगिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे, परत पुन्हा हा शेतकरी उभा करायचा असेल तर त्याला भरघोस अशी मदत झालीच पाहिजे. शेजारील मध्य प्रदेश  राज्यात केळीला १  लाख रुपये हेक्टर प्रमाणे मदत मिळाली आहे, त्याच प्रमाणे  रावेर-मुक्ताईनगर परिसरातील शेतकऱ्यांना सुद्धा ह्याच धर्तीवर मदत झाली पाहिजे. सन  २०११ , २०१३  व  २०१४   मध्ये वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे जे नुकसान झाले होते त्याची भरपाई म्हणून तत्कालीन केंद्रीय कृषी मंत्री ना. शरदचंद्र पवार यांनी  केंद्रीय आपत्ती निवारण कक्षामार्फत शेतकरयांना भरघोस  मदत केली होती. त्याच प्रमाणे केंद्र सरकारने भरीव नुकसान भरपाई द्यावी.  वादाळामुळे शेतकऱ्यांचा जो विद्युत पुरवठा खंडित झाला आहे तो तात्काळ सुरु करण्यात यावा अन्यथा ज्या शेतकऱ्यांनी नवीन केळी पिकाची लागवड केली आहे तसेच कपाशीची लागवड केली आहे ते पाण्या अभावी सुकून जाईल व दुबार पेरणीचे संकट येईल. त्याच प्रमाणे विमा कंपनीचे सर्वे करणारे जे प्रतिनिधी फिरत आहे ते शेतकऱ्यांची आर्थिक लूट करत आहे , ५०,६० टक्के नुकसानीची नोंद करत आहे आणि त्यापेक्ष जास्त नोंद करायची असेल तर ते शेतकऱ्यांकडून पैसे उकळत आहे ह्याचा बंदोबस्त झाला पाहिजे. आणि सरसकट १००  टक्के नुकसानीचे पंचनामे झाले पाहिजे आदी मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या. निवेदनावर  गोकूळ पाटील, रमेश पाटील, देविदास पाटील, प्रशांत पाटील, राजेंद्र पाटील, सोपान पाटील, समाधान पाटील, योगेश घाटे, सौरभ पाटील, प्रशांत पाटील, भूषण पाटील आदींची स्वाक्षरी आहे. 

 

Protected Content