उत्तर प्रदेश मंत्रिमंडळात फेरबदलाचे संकेत

 

लखनौ : वृत्तसंस्था । उत्तर प्रदेशात मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरू झालेली असतानाच भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री  बी.एल  संतोष  लखनऊमध्ये दाखल झाले. त्यामुळे मंत्रिमंडळात मोठे फेरबद्दल होणार असल्याचं बोललं जात आहे.

 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत उत्तर प्रदेशातील आरोग्य व्यवस्था कोलमडून गेल्याचं दिसून आलं. रुग्ण आणि नातेवाईकांचे मूलभूत आरोग्य सुविधांअभावी प्रचंड हाल झाले. वेळेत उपचार न मिळाल्यानं अनेकांना प्राण गमवावे लागले, गंगेत वाहून आलेल्या मृतदेहांवरून योगींचं सरकार टीकेचं धनी ठरलं. उत्तर प्रदेशातील परिस्थितीवरून मोदी सरकारलाही लक्ष्य केलं गेलं.

 

पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका असलेल्या उत्तर प्रदेशातील या परिस्थितीची दखल घेत कोरोना हाताळणीची वस्तुस्थिती जाणून घेण्यासाठी आढावा घेणं सुरू केलं आहे. भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री अर्थात महासचिव बी.एल. संतोष उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर असून, ते योगींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांच्या वैयक्तिक भेटी घेणार आहेत.

 

उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात आल्यानंतर पहिल्यांदाच अशा प्रकारे जमिनीवरील वस्तुस्थितीचा आढावा घेतला जात आहे. उत्तर प्रदेशातील कोरोना हाताळणीवरून पक्ष संघटनेत कूरबुरी सुरू झाल्या आहेत. जनतेच्या समस्या सोडवण्याबद्दल राज्यातील नेतृत्व बेजबाबदारपणे वागत असल्याचं भाजपाचे मंत्री आणि आमदाराचं सार्वजनिकपने  बोलत आहेत. दुसरीकडे विधानसभेच्या अनुषंगाने महत्त्वाच्या असलेल्या पंचायत निवडणुकांमधील प्रदर्शनही पक्षाच्या जिव्हारी लागलेलं आहे.

 

संतोष यांनी सोमवारी लखनऊमध्ये ‘वन टू वन’ स्वरूपात योगींच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांशी आणि पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशीही त्यांनी चर्चा केली. संतोष यांनी मंत्री आणि पक्षाच्या नेत्यांच्या वैयक्तिक भेटी घेतल्या. यात कोरोना काळातील कामं आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासंदर्भातील रणनीतीबद्दल सूचना करण्यास सांगितलं. भाजपा आणि सरकारमध्ये समन्वय नसल्याचं तसंच पक्षाचे नेते प्रशासनाकडून कामं करून घेण्यास असमर्थ ठरले असल्याची माहिती देण्यात आली असल्याचं सूत्रांनी सांगितलं.

 

संतोष यांनी सोमवारी काही मंत्र्यांसोबत बैठका घेतल्या. उत्तर प्रदेशचे आरोग्य मंत्री जय प्रताप सिंग, वैद्यकीय शिक्षण आणि अर्थमंत्री सुरेश खन्ना आणि कायदा मंत्री ब्रिजेश पाठक यांच्यासह सात मंत्र्यांशी त्यांनी वैयक्तिक भेटी घेऊन चर्चा केली. उत्तर प्रदेशातील परिस्थिती हाताळण्यावरून सरकारविरोधात बोलणाऱ्यांपैकी पाठक हे भाजपातील पहिले मंत्री होते. मंगळवारी संतोष हे उत्तर प्रदेशचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा आणि केशव प्रसाद मौर्या यांची भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं वृत्त आहे.

 

Protected Content