मुझफ्फनगर वृत्तसंस्था | केंद्र सरकारने संमत केलेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात आगामी २७ सप्टेंबर रोजी भारत बंद करण्याचा निर्णय शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केला. आजच्या महापंचायतीत त्यांनी ही घोषणा केली.
मागील कित्येक महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर शेतकर्यांचे आंदोलन सुरु आहे. केंद्राने लागून केलेल्या कृषी कायद्यांना परत घ्यावं अशी मागणी या शेतकर्यांनी केली आहे. या मुद्द्यावर शेतकरी आणि केंद्र सरकार यांच्यात चर्चेच्या अनेक फेर्या झाल्या. मात्र, या चर्चांतून कोणताही ठोस मार्ग निघालेला नाही. त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलनाने जोर पकडला आहे. शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणारे राकेश टिकैत उत्तर प्रदेशमध्ये महापंचायतीच्या माध्यमातून शेतकर्यांचे मेळावे भरवत आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशमध्ये आज शेतकर्यांची महापंचायत भरवण्यात आली आहे.
यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. ते म्हणाले की. गेल्या नऊ महिन्यांपासून शेतकरी दिल्लीच्या सीमेवर बललेले आहेत. या वर्षाच्या जानेवारीपासून सरकारने आमच्याशी संवाद साधणं बंद केलेलं आहे. देशाची संपत्ती विकणार्यांना आपण ओळखलं पाहिजे. फक्त उत्तर प्रदेशच नव्हे तर उत्तराखंड तसेच संपूर्ण देशात अशा सभा आणि बैठका घेतल्या पाहिजेत. देशात रेल्वे, जहाज आणि विमानतळं विकले जाणार आहेत.
यावेळी बोलताना राकेश टिकैत यांनी शेतकर्यांच्या पिकाला योग्य भाव मिळाला नाही तर निवडणुकीत मतदानही मिळणार नाही, असे सांगितले. ही लाढाई ही कृषी कायदे आणि किमान आधारभूत किंमत यासाठी आहे. शेतकर्यांच्या पिकाला योग्य भाव मिळत नसेल तर शेतकरी मतदान करणार नाहीत. आता मतदानाच्या माध्यमातून आपल्याला घाव घालावा लागेल, असे टिकैत म्हणाले. महापंचायतीदरम्यान राकेश टिकैत यांनी येत्या २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची घोषणा केली आहे. याआधी किसान मोर्चाने २५ सप्टेंबर रोजी भारत बंद करण्यात येईल असे सांगितले होते.