शेंदूर्णी प्रतिनिधी । केंद्राने ३ शेतकरी कायद्यांना मंजुरी दिली असून हे कायदे शेतकरी विरोधी असल्याने ते परत घेण्यात यावेत किवां त्यांत दुरुस्ती करण्यात यावी यामागणीसाठी दिल्लीत मागील १२ दिवसांपासून आंदोलन सुरु आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व शेतकरी विरोधी कायदे रद्द करण्यात यावेत यासाठी आज भारत बंद आंदोलन पुकारण्यात आले असून या आंदोलनास शेंदुर्णी व जामनेर तालुक्यात उत्तम प्रतिसाद मिळाला.
केंद्र सरकारने शेतकरी विरोधी ३ कायद्यांना नुकतीच मंजुरी दिली असून त्या कायद्याचा संपूर्ण देशातील शेतकरी विरोध करत आहेत. प्रस्तावित कायदा लागू झाल्यास शेतकऱ्यांना आपले अस्तित्व गमावून बसावे लागणार असून शेती व्यवसाय भांडवलदारांच्या हाती जाणार असल्याचे शेतकऱयांचे म्हणणे आहे. या कायद्यावर साधक बाधक चर्चा न करता घाईघाईने कायदे मंजूर करण्यात आले असल्याने व शेतकरी हिताविरुध्द कायदे असल्यामुळे पंजाब, हरियाणा, दिल्ली,व इतर राज्यातील हजारोंच्या संख्येने शेतकरी गेल्या १२ दिवसापासून दिल्लीत थंडीत रस्त्यावर आंदोलन करीत आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आज देशव्यापी बंद पुकारण्यात आला होता. त्याला शेंदूर्णी व जामनेर तालुक्यात १००% प्रतिसाद मिळाला. येथील महाविकास आघाडीचे वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते संजय गरूड, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमूख डॉ. मनोहर पाटील ,राष्ट्रीय काँग्रेसचे तालुका अध्यक्ष शरद पाटील यांच्या आवाहनानुसार केंद्र सरकारने मंजूर केलेल्या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात शेंदूर्णी व संपूर्ण जामनेर तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. आज सकाळी ९ वाजता येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून शेंदूर्णी येथिल महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरवात केली. यावेळी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य सागरमल जैन, माजी पंचायत समिती सदस्य सुधाकर बारी, शांताराम गुजर, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष श्रीराम काटे, राष्ट्रीय काँग्रेसचे शहर अध्यक्ष अंबरीश गरूड, शिवसेनेचे शहर प्रमुख संजय सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे स्टेशन परिसरात रास्ता रोको करण्यात आला. यावेळी महाविकास आघाडीतील मित्र पक्ष शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रीय काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.