जळगाव प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीचा विवाह सतर्क नातेवाइकांमुळे एमआयडीसी पोलिसांनी रोखला. तालुक्यातील कुसुंबा येथे शुक्रवारी दुपारी बालविवाह होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिसांनी विवाहस्थळी पोचून हा विवाह रोखला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कुसूंबा येथील गायरान भागात शुक्रवारी दुपारी १२ वाजेच्या सुमारास अल्पवयीन मुलीचा विवाह सुरू होता. दरम्यान, यातील वधू ही १५ वर्षांची असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्यातील पोलीस निरिक्षक विनायक लोकरे यांना मुलीच्या सुरत येथील एका नातेवाइकाने दिली. माहिती मिळताच लोकरे यांनी पोलीस कर्मचारी रामकृष्ण पाटील व हेमंत कळस्कर यांना बोलवून कुसूंबा येथे जावून विवाह रोखण्याच्या सूचना केल्या. दोन्ही पोलीस कर्मचारी कुसूंबा गावात आल्यानंतर त्यांना अल्पवयीन मुलीचा विवाह झालेला दिसून आला़ नंतर त्यांनी तो रोखला़ पोलिसांनी त्यानंतर अल्पवयीन मुलीस बालसुधारगृहात पाठविले. दरम्यान, याप्रकरणी कुसूंबा पोलीस पाटील यांच्या फिर्यादीवरून अल्पवयीन मुलीचा पती, तसेच त्या मुलीची आई, काका, आत्या व आत्याच्या पतीविरूध्द अल्पवयीन मुलीचे लग्न जमवून बालविवाह केले म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.