मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवाच्या अनुषंगाने ‘शिक्षणाचे महत्व’ या विषयावर एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
कार्यक्रमाचे उदघाटन संस्थेचे सचिव भालचंद्र कुलकर्णी यांनी माता सरस्वती व कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण, दीपप्रज्वलन करून केले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रवीण राठोड यांनी केले, त्यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश व रूपरेषा याची माहिती दिली.
प्रथम सत्राला प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून प्रा.प्रदीप तायडे सर, सरदार पटेल महाविद्यालय, ऐनपुर यांनी ‘महापुरुषांच्या दृष्टिकोनातून शिक्षणाचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षणातून माणूस नम्र होतो तर आपण घेतलेल्या शिक्षणाचा आपल्याला अहंकार नाही तर अभिमान असला पाहिजे असे प्रतिपादित केले. दुसऱ्या सत्रात प्रा.डॉ. प्रमोदजी अहिरे सर, नहाटा महाविद्यालय, भुसावळ यांनी ‘शैक्षणिक धोरण 2020 मधील उच्च शिक्षणाचे स्वरूप आणि महत्व’ या विषयावर मार्गदर्शन करताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात विद्यार्थ्यांना अनेक नवीन संधी उपलब्ध होतील असे प्रतिपादन केले. तिसऱ्या सत्राला लाभलेले मार्गदर्शक प्रा.डॉ.संदीप माळी सर, संत मुक्ताबाई महाविद्यालय, मुक्ताईनगर यांनी ‘सामाजिक जडनघडणीत शिक्षणाचे महत्व’ या विषयावर मार्गदर्शन करताना अनेक उदाहरणे देत विद्यार्थ्यांनी व्यवहारिक ज्ञान मिळवावे व व्यक्तिमत्व विकास करावा असे म्हटले. अंतिम सत्रात डॉ. शिवचरण उज्जैनकर सर उपस्थित होते.त्यांनी ‘कौशल्य विकास आणि उद्योजकता’ या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव भालचंद्रजी कुलकर्णी सर,अध्यक्ष प्रमोदजी शिवलकर सर, प्राचार्य सचिन जोशी सर विद्यार्थी विकास कार्यक्रम अधिकारी प्रवीण राठोड,प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.अतुल तेली सर तर आभार प्रदर्शन विद्यार्थी विकास महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. गीता वाघ यांनी केले.कार्यक्रमाची सांगता ‘वंदे मातरम’ ने करण्यात आली