जळगाव प्रतिनिधी । शहरात कुंटणखाना चालविणार्या कथित राजकीय पदाधिकारी महिलेवर कठोर कारवाई करण्याची मागणी महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे.
![](https://livetrends.news/wp-content/uploads/2025/01/Advt-2.jpg)
याबाबत वृत्त असे की, शहरातील पिंप्राळा परिसरात एक महिला कुंटणखाना चालवत असल्याचे उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. संबंधीत महिला ही एका राजकीय पक्षाची पदाधिकारी असल्याने राजकीय वर्तुळात याबाबत मोठ्या प्रमाणात चर्वण सुरू झाले आहे. या पार्श्वभूमिवर, आज महिला राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हा पोलीस अधिक्षकांना एक निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, कोणताही पक्ष हा विविध स्त्री-पुरूषांना पक्षवाढीसाठी पदाधिकारी म्हणून नियुक्त करत असतो. तथापि, नियुक्ती मिळाली म्हणजे कोणत्याही प्रकारचे अनैतिक काम करण्याची मुभा मिळेल असे नाही. यामुळे या प्रकरणी पक्ष संबंधीतावर आवश्यक ती कार्यवाही करेलच. पण, पोलिसांनी या महिलेवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. या निवेदनावर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा कल्पना पाटील यांच्यासह मीनल पाटील, लता मोरे, ममता पडवी आदी पदाधिकार्यांच्या स्वाक्षर्या आहेत.