किराणा दुकानाची भिंत फोडून ६८ हजारांच्या मालाची चोरी

चाळीसगाव प्रतिनिधी । शहरातील घाटरोडवर असलेल्या एका व्यापाऱ्याचे किराणा दुकानाची मागील भिंत फोडून अज्ञात चोरट्यांनी ६८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाला चोरून नेला आहे. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी की, राजेंद्र वामन पिंगळे (वय-५४) रा. कैलास नगर, भडगाव रोड चाळीसगाव यांचे शहरातील घाट रोडवर श्री गणेश प्रोव्हीजन किराणा दुकान आहे. नेहमीप्रमाणे २ जानेवारी रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारा दुकान बंद करून घरी निघून गेले. मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी दुकानाची मागची भिंत फोडून दुकानातील काजू, बदाम, कपडे धुण्याचे साबन, मसाला पावडर, गावराणी तूप असा एकुण ६८ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ३ जानेवारी रोजी सकाळी ७.३० वाजता राजेंद्र पिंगळे हे दुकान उघडण्यासाठी आले असता दुकानात चोरी झाल्याचे दिसून आले. शहर पोलीसांना माहिती कळविल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून राजेंद्र पिंगळे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ संदीप तहसीलदार करीत आहे.

Protected Content