भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील महिंदळे येथे बैलांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या तरूणाचा कालव्यात पाय घसरून पडल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुदैवी घटन २८ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास घडली आहे. याबाबत भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयूर नरेंद्रसिंग ठाकरे (वय २२ वर्ष, रा. गणेशपुरा, ता. साक्री) असे मयत तरुणाचे नाव आहे. मयुर हा दहावीपासून महिंदळे येथे असलेल्या त्याच्या मामाकडे शिकण्यासाठी आलेला होता.
याबाबत अधिक माहिती अशी की, भडगाव तालुक्यातील महिंदळे या गावात काही अंतरावर मयुरचे मामा देवासिंग नामदेव पाटील यांची शेती आहे. या शेताला लागूनच जामदा डावा कालवा आहे. घरी असल्यानंतर मयुर हा त्याच्या मामाला शेती कामात मदत करण्यासाठी शेतात जात जात होता, त्यानुसार मंगळवारी २८ फेब्रुवारी रेाजी दुपारी १२ वाजता मयुर हा मामासोबत गेला, मामा इतर कामात असल्याने मयुर बैलांना पाणी पाजण्यासाठी शेताजवळ असलेल्या कालव्यावर गेला. या ठिकाणी बैलांना पाणी पाजत असताना, मयुरचा पाय घसरला व तो कालव्यात पडला, मयुरला पोहता येत नसल्याने आणि पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने तो कालव्यात वाहत गेला. बराच वेळ झाला तरी मयुर परतला नाही, म्हणून मामासह इतरांनी शोध सुरु केल्यावर बैल सापडले, मात्र त्या ठिकाणी मयुर दिसला नाही. मयुर कालव्यात पडला असावा या शंकेने कालव्याचे पाणी वाहत असलेल्या दिशेने जाऊन पाहिले असता, काही अंतरावर मयुर आढळून आला. त्याला तत्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केल्यावर डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले.
मयत मयुरच्या पश्चात आई, वडील व एक बहिण असा परिवार आहे. या प्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल कैलास गिते व दत्ता मगर हे करीत आहेत.