कारागृहातून कैद्यांना पळून जाण्यास मदत करणारा जेरबंद

जळगाव प्रतिनिधी । कारागृहातून पलायन केलेल्या तीन कैद्यांना दुचाकीवर बसवून पळून जाण्यास मदत करणाऱ्या जगदीश पुंडलिक पाटील (१८, रा.पिंपळकोठा, ता.पारोळा) एलसीबीच्या पथकाने रविवारी रात्री अटक केली आहे. सुरतला जात असतानाच ट्रॅव्हल्स बसमध्ये पोलिसांनी त्याच्यावर पथकाने कारवाई केली.

गेल्या महिन्यात २५ जुलै रोजी गेट किपर म्हणून ड्युटीला असलेल्या कारागृह रक्षक पंडीत दामु गुंडाळे (वय-४७) यांच्या डोक्याला गावठी पिस्तुल लावून सुशील अशोक मगरे (वय-३२, रा.कसबे पहूर, ता.जामनेर), गौरव विजय पाटील (वय-२१, रा.तांबापुरा, अमळनेर) व सागर संजय पाटील (वय-२२, पैलाड, अमळनेर) या तीन न्यायालयीन कैद्यांनी कारागृहातून फिल्मीस्टाईल पलायन केल्याची घटना घडली होती.

या तिघांना घेण्यासाठी बाहेर जगदीश पाटील हा दुचाकीवर थांबलेला होता. त्याच्यासोबत एकाच दुचाकीवर हे चौघे जण पळून गेले होते. गुन्ह्यात वापरलेली दुचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले.

कारागृहातून बाहेर आल्यावर सर्व जण नंदूरबार येथे गेले. तेथून सुशील मगरे व गौरव पाटील दोघं जण सोबत तर सागर पाटील व जगदीश पाटील हे दोघं जण सोबत परंतु वेगवेगळ्या दिशेने गेले होते, अशी माहिती जगदीश याने तपासात पोलिसांना दिली आहे.

सागर व गौरव या दोघांनी देखील कारागृहातून पलायन केल्यानंतर अमळनेरात येऊन दुचाकी चोरी केल्याचे प्रकरण उघड झाले आहे. जगदीश पाटील हा रविवारी रात्री पारोळा येथून सुरतला जाण्यासाठी एका ट्रॅव्हल्स बसमध्ये बसला होता. ही माहिती पोलीस निरीक्षक बापू रोहोम यांना मिळाल्यानंतर धुळे साक्री रोडवर बस अडवून जगदीश याला ताब्यात घेण्यात आले.

Protected Content