कारगिल युद्धासाठी पाकिस्तानी सैन्याकडे शस्त्रेदेखील नव्हते

क्वेटा: वृत्तसंस्था । ‘पाकिस्तान डेमोक्रेटीक मुव्हमेंट’च्यावतीने क्वेटामध्ये तिसरी जाहीर सभा पार पडली. या सभेत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ सहभागी झाले कारगिलचे युद्ध पाकिस्तानी सैन्याने नव्हे , काही मोजक्या अधिकाऱ्यांनी लादले होते. या युद्धासाठी पाकिस्तानी सैन्याकडे शस्त्रेदेखील नव्हते, असे शरीफ यांनी म्हटले.

लंडनहून व्हिडिओ लिंकद्वारे सभेत सहभागी झालेल्या नवाझ शरीफ यांनी पाकिस्तान सरकार आणि लष्करी हुकूमशाहीवर टीका केली. शरीफ यांनी म्हटले की, कारगिल युद्धात पाकिस्तानचे अनेक जवान ठार झाले. जगासमोर पाकिस्तानची नाचक्की झाली. यासाठी सैन्यातील काही मोठे अधिकारीच जबाबदार होते. या मोजक्या लोकांनी देशालाच युद्धात ढकलले. या युद्धामुळे काहीच मिळाले नाही. पाकिस्तानच्या सैन्याला पुरेसे अन्नही मिळाले नव्हते. पाकिस्तानच्या या काही मोजक्या अधिकाऱ्यांनी आपले कृत्य लपवण्यासाठी आणि शिक्षेपासून वाचण्यासाठी मार्शल लॉ घोषित केला. परवेझ मुशर्रफ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वैयक्तिक फायद्यासाठी सैन्याचा वापर केला असल्याची टीका शरीफ यांनी केली.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख बाजवा आणि आयएसआय प्रमुख हमीद यांच्यावरही शरीफ यांनी टीका केली. पाकिस्तानच्या सध्याच्या वाईट परिस्थितीसाठी हे दोघेही जबाबदार असल्याचा आरोप शरीफ यांनी केला. शरीफ यांनी सांगितले की, २०१८ मध्ये झालेल्या निवडणुकीतील गोंधळ आणि इतर बाबींवर या दोघांनीही उत्तर द्यावेच लागणार आहे. शरीफ यांनी जावई कॅप्टन (निवृत्त) मोहम्मद सफदर यांच्या अटकेवरूनही सरकारवर टीका केली. कोणाच्या इशाऱ्यावरून सफदर यांना अटक झाली असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

भारताचे तत्कालिन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे तत्कालिन पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दोन्ही देशांदरम्यान शांतता प्रस्तावावर चर्चा सुरू केली होती. पंतप्रधान वाजपेयी यांनी दिल्ली-लाहोर बस सेवाही सुरू केली होती. मात्र, त्यानंतर पाकिस्तानच्या सैन्याने घुसखोरी करत भारताच्या हद्दीतील काही कारगिल, द्रास आदी सेक्टरमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर ताबा मिळवला होता. भारताच्या सैन्याने पराक्रम गाजवत पाकिस्तानी सैन्याला या युद्धात धूळ चारली होती. त्यानंतरच्या काही महिन्यातच तत्कालीन पाकिस्तानचे लष्करप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी नवाझ शरीफ यांना सत्तेवरून हटवत सत्तेची सुत्रे हाती घेतली होती.

दरम्यान, पाकिस्तानच्या विरोधी पक्षाांच्या ‘पाकिस्तान डेमोक्रेटीक मुव्हमेंट’च्यावतीने सरकारविरोधात आंदोलनाची पार्श्वभूमी तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक प्रांतात एक सभा झाल्यानंतर इस्लामाबादपर्यंत लाँग मार्चही काढण्यात येणार आहे.

Protected Content