जळगाव प्रतिनिधी । कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या कापूस खरेदी बाबात अनेक तक्रारी आल्या आहेत. कृषी उत्पन्न बाजार समिती पाठविलेल्या सर्व वाहनांवरील कापूस खरेदी करावा, काही ठराविक वाहनाची खरेदी करताना दिसून येत आहे. काही ठिकाणी टोकण व्यापाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिले जात आहे. हे चुकीचे असून जास्तीत जास्त प्रमाणात शेतकऱ्यांचा कापूस खरेदी कारवा असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांनी केले.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बैठकीत कापूस खरेदी -विक्री संदर्भात जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. या बैठकीत जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व सचिव याची उपस्थित होते.
जिल्ह्यात नवीन कापूस खरेदी केंद्रासाठी पालकमंत्र्यांची मागणी
यासाठी सहाकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांच्याशी संपर्क साधून जिल्ह्यातील कापूस खरेदीबाबत माहिती दिली. जिल्हयात नव्याने चार ते पाच कापूस खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी केली असून जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे यांनी तसा प्रस्ताव मंत्रीमंडळाकडे पाठविला आहे.
जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे म्हणाले की, दिवसाला किमान १०० वाहने सीसीआय केंद्र, फेडरेशन किंवा कापूस खरेदी केंद्रावर मोजावी. जास्तीत जास्त वाहने रिकामे करतांना सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे. केंद्रावर मजूर कमी असतील तर लॉकडाऊनच्या काळात आपापल्या घरी आलेले मजूर आज घरी बसून आहे. अश्या गरजू मजूरांशी संपर्क साधून त्यांना कामावर घ्यावे जेणेकरून त्यांचा रोजंदारीचा प्रश्न मिटेल आणि कापूस खरेदी करण्यासाठी अडचण भासणार नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती यांनी किमान दिवसातून एकदा जाऊन पाहणी करावी. तसेच ज्या तालुक्यात कापूस खरेदी केंद्र नाही त्यांनी बाजूच्या तालुक्यातील केंद्रावर जाऊन कापूस विक्री करावी, मजूर नसेल तर लॉकडाउन काळात आपापल्या घरी आलेल्या गरजू नागरिकांना कामावर घ्यावे, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी सर्व सुचना दिल्यानंतर उपस्थितांकडून कापूस खरेदी करण्यासाठी आलेल्या अडचणींचे निंसारण केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत
राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यावर मात करण्यासाठी जिल्हाप्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्री
उध्दव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत धरणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने सभापती सुनिल पवार यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस २ लाख ५१ हजार रूपयांचा धनादेश दिला. तसेच दी.जळगाव जिल्हा मध्य.सह.बँक वरिष्ठ नोकरांची सह.पतपेढी लि यांच्यातर्फे १ लाख ११ हजार रूपयांचा धनादेश तर योगेश ट्रेडिंग कंपनीच्या वतीने ११ हजार रूपयांचा धनादेश आज पालकमंत्री ना. पाटील यांच्याकडे सुपूर्द केला.