पाचोरा, नंदू शेलकर । कोरोनामुळे तालुक्यासह शहरात कानबाई मातेचा उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.
यावर्षी जिल्ह्यात कोरोना काही प्रमाणात नियंत्रणात आला असला तरी नागरिकांनी कोरोनाची साथ वाढणार नाही याची काळजी घेत गेल्यावर्षीप्रमाणे नियम पाळून कानुबाई मातेचा उत्सव साजरा केला
कानबाई उत्सवाची तयारी आठ दिवस अगोदरच सुरू होते. घराला रंगरंगोटी होते. साफसफाई केली जाते. एकत्र कुटुंब असेल तर रोटांसाठी घरातील लहान- मोठ्या पुरुषांना मोजून प्रत्येकाची सव्वा मूठ असे धान्य म्हणजे गहू, हरभऱ्याची डाळ घेतली जाते. पुरणपोळी, खीर, कटाची आमटी, हरभऱ्याची डाळ, गंगाफळ तथा लाल भोपळ्याची भाजी असा नैवेद्य असतो. यामध्ये कांदा-लसूण वर्ज असतो.
कानबाई मातेला नथ, डोळे, बसवून इतरही पारंपरिक दागिने घातले जातात. केळीचे व कण्हेरीचे खांब बांधलेल्या चौरंगावर तांब्याचा कलश ठेवून तिची स्थापना केली जाते. कण्हेरीला खानदेशात फार महत्त्व आहे. कळसावर गळ्यातले हार, मणी- मंगळसूत्र चढवले जाते. वरून शेवंतीची वेणी चढवुन ओढणी लावली जाते. मातेला आरती, नैवेद्य दाखवतात. नैवेद्याला अर्थातच पुरणपोळ्या, पुरणाचेच दिवे, देवीचा सगळा साज म्हणजे भंडारा, वेणी, फणी, आरसा, बांगड्या, टिकली, पोळपाट- लाटणे, तवा हे सगळं कणकेचेच करतात. रात्री जागरण केले जाते. फुगड्या, गाणी म्हटली जातात. काही जणांकडे फक्त रोट असतात. मग ते रोट परातीत घेऊन कानबाईच्या दर्शनाला येतात. दुसऱ्या दिवशी पूर्ण गावांतील कानबाईंची विसर्जन मिरवणूक एकाचवेळी निघते. ढोल – ताशांच्या गजरात कानबाईचा चौरंग डोक्यावर ठेवून महिला नदीवर निघतात. फुगड्या खेळल्या जातात. वाजतगाजत जाताना समोरून दुसरी कानबाई आली, तर दोन्ही कानबायांची चौरंग जोडून भेट घडवली जाते. नदीवर विसर्जन होते. परंतु गेल्या वर्षी विसर्जन सोप्या पद्धतीने करण्यात आले होते.
https://www.facebook.com/508992935887325/videos/810549946493594