सातारा वृत्तसंस्था । भाजपचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रथमच कांदा निर्यातबंदीवरुन भाजप सरकारला घरचा आहेर दिला आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीकोनातून केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीचा घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे पत्रक काढून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
सध्या देशात लॉकडाऊनमुळे शेतकरी बॅकफूटवर गेला असताना ग्राहक संरक्षण मंत्रालयाने सरकारला दिलेला कांदा निर्यातबंदीचा निर्णय शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे. त्यामुळे कांदा निर्यातबंदी बाबत सरकारने घेतलेला निर्णय त्वरीत मागे घ्यावा, अशी मागणी त्यांनी या पत्रात केली आहे. या कांदा निर्यातबंदीबाबत केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांची भेट घेणार असल्याचंही त्यांनी पत्रकात नमूद केले आहे.