काँग्रेसची खोटारडेपणाची फॅक्ट्री सुरू आहे-भाजपा

 

नवी दिल्ली, वृत्तसंस्था ।  सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची खोटारडेपणाची फॅक्ट्री सुरू आहे असा हल्लाबोल भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी केला आहे.

सोनिया गांधी यांनी जीएसटीच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर आरोप केला. तसेच राज्यांना जीएसटीचा वाटा न दिल्याने केंद्राने विश्वासघात केला असल्याचं देखील म्हटलं आहे. याला भाजपाच्या खासदारांनी आता प्रत्युत्तर दिलं आहे. सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची खोटारडेपणाची फॅक्ट्री सुरू आहे असा हल्लाबोल भाजपाचे खासदार निशिकांत दुबे यांनी यांनी केला आहे.

निशिकांत दुबे यांनी बुधवारी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचे एक ट्विट केलं आहे. सोनिया गांधींनी आयोजित केलेल्या या बैठकीत जीएसटी, जेईई-नीट परीक्षा, देशाची आणि राज्यांची आर्थिक स्थितीसह लॉकडाऊनच्या मुद्द्यांवरही चर्चा झाली. त्यानंतर दुबे यांनी जोरदार टीका केली आहे. “सोनिया गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसची खोटं बोलण्याची फॅक्ट्री सुरू आहे. भाजपाने काँग्रेसच्या 1 लाख कोटी रुपयांची व्हॅटची वचनपूर्ती केली. जे 2009 ते 2014 दरम्यान पूर्ण करण्यात काँग्रेस अपयशी ठरली होती. यामुळे निश्चिंत राहा आणि विश्वास ठेवा. जीएसटीबाबत राज्यांना दिलेले वचन भाजप पूर्ण करेल” असं दुबे यांनी म्हटलं आहे.

निशिकांत दुबे यांनी या ट्विटसोबतच आणखी एक ट्विट केलं आहे. “जीएसटीत राज्यांना वाटा देण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिले होते. ‘प्राण जाये पर वचन ना जाए’ हेच त्यांचे तत्व आहे. तर ‘अपने झूठ से जानिए पराए दिल का हाल’ हा काँग्रेसचा नारा आहे. व्हॅटमधील 1 लाख कोटी राज्यांना देण्याचे आश्वासन काँग्रेसने राज्यांना दिले होते. ते भाजपा सरकारने पूर्ण केले. काँग्रेसला लाज वाटली पाहिजे” असं देखील दुबे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

सोनिया गांधी यांनी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे काम सुरू केले आहे. सोनिया गांधी यांच्या उपस्थितीत काँग्रेसशासित 7 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. यात काँग्रेसचे 4 तर इतर पक्षांचे 3 मुख्यमंत्री सहभागी झाले होते. यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पुदुच्चेरीचे मुख्यमंत्री व्ही. नारायणस्वामी, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेलही उपस्थित होते.

Protected Content