मुंबई: वृत्तसंस्था । केंद्राचा शेतकरी व कामगारांना उद्योगपतींचे गुलाम बनवण्याचा डाव आहे. कृषी कायद्याविरोधातील काँग्रसचे जनआंदोलन हा नव स्वातंत्र्यलढाच असल्याचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने आणलेले शेतकरी व कामगार विरोधी काळे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. महात्मा गांधी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री जयंतीचे निमित्त साधून काँग्रेसने राज्यभरात ‘किसान मजदूर बचाओ दिन’ पाळला व आंदोलन केले.
केंद्र सरकारने आणलेले कृषी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने राज्यव्यापी आंदोलनाची सुरुवात केली आहे. राज्याच्या सर्व जिल्हा व तालुका मुख्यालयी काँग्रेस पक्षाच्या वतीने आंदोलने करण्यात आली.
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली लासलगाव येथे धरणे आंदोलन करण्यात आले. आमदार हिरामण खोसकर, नाशिक जिल्हा काँग्रेस अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे, नाशिक शहर काँग्रेसचे अध्यक्ष शरद आहेर, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
शेतकरी, कामगार विरोधी कायदे तातडीने रद्द करावे या मागणीसाठी काँग्रेस पक्ष दोन कोटी शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या मार्फत राष्ट्रपतींना निवेदन देणार आहे. या मोहिमेचा शुभारंभ लासलगाव येथे धरणे आंदोलन कार्यक्रमात करण्यात आला. मोठ्या संघर्षातून बाजार समिती आणि हमीभाव ही व्यवस्था उभी राहिली. जुलमी कृषी कायद्यामुळे भाजप सरकार ही शेतकरी हिताची व्यवस्था मोडीत काढत आहे. कंत्राटी शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना भूमिहीन करून उद्योगपतींचा फायदा करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे असे त्यांनी नमूद केले.
नांदेडमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली बैलगाडी लाँग मार्च काढण्यात आला. अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्रातील सरकार, ‘हम करेसे कायदा, अशा हुकुमशाही प्रवृत्तीने वागत आहे. त्याच पद्धतीने हे कायदे मंजूर केले आहेत. कायद्याच्या माध्यमातून देशाची लूट करायचे काम सहा वर्षापासून सुरू आहे. ब्रिटिश काळात ईस्ट इंडिया कंपनीने देशाला लुटले तशाच पद्धतीने आता भाजपाच्या रूपाने व्यापारी देशाला लुटत आहेत.
मुंबईतील आंदोलनात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष एकनाथ गायकवाड, आमदार भाई जगताप यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला. गुजरातचे प्रभारी खासदार राजीव सातव यांनी हिंगोली मध्ये तर अमरावती येथे महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन करण्यात आले. नंदूरबार येथे आदिवासी विकास मंत्री के. सी. पाडवी तर मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर येथे आंदोलन केले. सतेज पाटील यांनी कोल्हापूर येथे तर कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगली येथे आंदोलन करण्यात आले.