जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील कुसूंबा येथे एका शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरामध्ये गळफास घेवून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेबाबत एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून सोमवारी शवविच्छेदन करून मृतदेह कुटूंबियांच्या ताब्यात देण्यात आला आहे. दीपक संतोष पाटील (३५, रा.कुसूंबा) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील कुसुंबा येथे दिपक पाटील हा आपल्या परिवारासह वास्तव्याला होता. शेती व कंपनीत जावून आपला उदरनिर्वाह करीत होता. त्याच्यावर शेतीचे कर्ज होते. शनिवारी १९ मार्च रोजी दीपक यांच्या पत्नी मुलांसह माहेरी गेल्या होत्या. त्यामुळे घरी दीपक व त्यांच्या आईच होत्या. रविवारी २० मार्च रोजी सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास त्यांनी आईला दुकानात काही तरी वस्तू घेण्यास पाठविले. आई दुकानावर गेली तेवढ्यात त्यांनी पॅन्टच्या सहाय्याने घरात गळफास घेवून आत्महत्या केली. रात्री ८ वाजेच्या सुमारास आई दुकानावरून घरी परतल्यावर त्यांना मुलगा हा गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसताच त्यांनी आक्रोश केला. सोमवारी सकाळी जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.