कपाशीच्या भावासाठी रवींद्र नाना पाटील यांचे आमरण उपोषण सुरू

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | कपाशीला किमान १२ हजार रूपयांचा भाव मिळावा, तसेच शेतकर्‍यांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्यात यावे या मागण्यांसाठी आज युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष रवींद्रनाना पाटील यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.

 

रवींद्र नाना पाटील यांनी कालच आपल्या उपोषणाची भूमिका स्पष्ट केली होती. या अनुषंगाने आज सकाळी दहा वाजून दहा मिनिटांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमरण उपोषण सुरू झाले. याप्रसंगी प्रारंभ रवींद्र नाना पाटील यांनी आपल्या मनोगतातून सरकारवर टिका केली. शेतकर्‍यांच्या घरात कपाशी पडून असल्यामुळे लक्षावधी शेतकरी तणावात असल्याचे सरकारला काहीही वाटत नसल्याचे ते म्हणाले. तर याप्रसंगी माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराती, माजी मंत्री गुलाबराव देवकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैय्या पाटील, ज्येष्ठ नेते संजय गरूड, विलास पाटील, माजी आमदार कैलास पाटील, भुसावळचे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उद्या संध्याकाळी जळगावात येत असून परवा त्यांच्या उपस्थितीत अमळनेर येथे कार्यक्रम आहे. या पार्श्‍वभूमिवर, युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष रवींद्र नाना पाटील यांनी सुरू केलेले उपोषण हे लक्षवेधी ठरले आहे.

Protected Content