कन्या पूजन म्हणजे भारतमातेच्या शक्तीचा यथोचित सन्मान – महामंडलेश्वर जनार्दन महाराज

फैजपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जगाच्या पाठीवर भारत भूमीला अनन्य साधारण महत्व असून हा धार्मिकतेचा वारसा असलेला देश आहे म्हणून भारताला भारत माता म्हणून संबोधले जाते. त्याच अनुषंगाने भारत मातेच्या कन्या या पूजनीय आहे, आणि हे पूजन भारतीय संस्कृतीचा गाभा आहे, भारत मातेचा हा सन्मान आहे, असे मत महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी सांगितले.

फैजपूर परिसरातील वढोदा, पिंपरुड, विरोदा या खेडेगावाच्या कुशीत नावारूपाला येत असलेल्या श्री सतपंथ चॅरिटेबल ट्रस्ट निर्मित श्री निष्कलंक धाम निसर्गोपचार केंद्र येथे नवरात्र उत्सव दरम्यान कन्या पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. परिसरातील अत्यंत गरीब व सामान्य कुटुंबातील कन्यांचे पाद्यपुजन करून त्यांना सन्मानाने आसनावर बसवून पोटभर जेवण, शालेय दप्तरासह श्रृंगाराचे साहित्य, चुनरी, बांगड्या, मेहंदी असे साहित्य भेट म्हणून देण्यात आले. जवळपास सव्वाशे कन्यांचा सत्कार सन्मान पूजन करण्यात आल्याने प्रत्येक कन्येच्या चेहऱ्यावर अतूट आणि अविस्मरणीय असा आनंद अनुभवास आला.

महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांच्या श्री सतपंथ चरिटेबल ट्रस्टतर्फे या सेवाभावी संस्थेच्या वतीने दरवर्षी कन्यांचा सन्मान हा कार्यक्रम गेल्या दहा ते बारा वर्षापासून नियमित सुरू आहे. त्यामुळे या दिवसाची परिसरातील मुली मोठ्या आतुरतेने वाट पाहत असतात. कन्या पूजनाच्या अध्यात्मिक कार्यक्रमा सोबत शासनाच्या “बेटी बचाओ बेटी पढाओ…” चा नारा देत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम साजरा केला जातो. सतपंथ संस्थानचे गादिपती परमपूज्य जनार्दन हरीजी महाराज यांनी यावेळी सांगितले की, नारी ही देशाची शक्ती असून मातृसत्ताक संस्कृती ही आपल्या भारताची संस्कृती आहे. परंतु ती महान संस्कृती आपण काहीसे विसरत चाललो आहोत. याकरिता कन्या पूजनाच्या माध्यमातून कन्येचे महत्व समाजाला व येणाऱ्या पिढीला कळावे याकरिता कुवारीका कन्या पूजनाचा कार्यक्रम आपण दरवर्षी साजरा करीत असतो. त्या नवदुर्गा रुपी बालिकांच्या चेहऱ्यावर काही वेगळाच आनंद सर्वांना अनुभवास येतो. यावेळी सतपंथ परिवारातील दानशूर भाविक भक्तगण, कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content