कंदहार विमानतळावर रॉकेट हल्ला

 

कंदहार  : वृत्तसंस्था  । अफगाण लष्कर आणि तालिबानी यांच्यात चकमकी सुरू असतानाच कंदहारमधील आंतरराष्ट्रीय विमानतळावर रॉकेट हल्ला करण्यात आला आहे.

 

काल रात्री तीन रॉकेट डागण्यात आले.  एक विमानतळावर तर दोन हवाई पट्ट्यांवर डागण्यात आले. त्यामुळे सर्व विमानं रद्द करण्यात आली. विमानतळ अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

 

 

अफगाणिस्तानातून अमेरिकेनं लष्कर मागे घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर तालिबानने पुन्हा वर्चस्व प्रस्थापित करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. तालिबानकडून अफगाणिस्तानातील वेगवेगळ्या भागांवर कब्जा मिळवण्याचे प्रयत्न केले जात असून, मोठा संघर्ष निर्माण झाला आहे.

 

अमेरिकन लष्कराने परतीचे रस्ते धरल्यानंतर अफगाणिस्तानात पुन्हा तालिबान संकट उभं राहिलं आहे. अमेरिकी सैन्याची पाठ फिरताच उत्तर अफगाणिस्तानात तालिबानने उच्छाद मांडला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या घोषणेपासून तालिबाननं अफगाणमधील विविध भागांवर आक्रमण करण्यास सुरूवात केली. काही दिवसांपूर्वी अफगाणिस्तानातील ८५ भागांवर कब्जा मिळवल्याचा दावा तालिबाननं केला होता. पूर्वी कंदहार हेच तालिबानचं मुख्यालय होतं. त्यामुळे उत्तर अफगाणिस्तानसह कंदहारमधील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चालली आहे. यापूर्वी ७ एप्रिल २०२१ रोजीही कंदहार विमानतळावर तालिबानकडून हल्ला करण्यात आला होता.

 

या हल्ल्याबद्दल अधिकची माहिती अद्याप समोर आलेली नाही. अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यानंतर तालिबानची तिथे मोठ्या प्रमाणात दहशत निर्माण झाली आहे. मॉस्कोमधील तालिबानी शिष्टमंडळाने अफगाणिस्तानच्या ३९८ जिल्ह्यांपैकी २५० जिल्हे ताब्यात घेतल्याचा दावा केलेला आहे.

 

 

तालिबानने उत्तर अफगाणिस्तान या त्यांच्या जुन्या बालेकिल्ल्यात जम बसवला असून तेथे वांशिक अल्पसंख्याकांची संख्या जास्त आहे. अनेक कुटुंबे पलायन करीत असून भीतीयुक्त जीवन जगत आहेत. गेल्या १५ दिवसांत एकूण ५६०० कुटुंबांनी त्यांच्या घरातून पलायन केले असल्याचे निर्वासित मंत्रालयाने म्हटले आहे.

 

Protected Content