भुसावळ प्रतिनिधी | जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणार्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकीय अधिकार्यांचे रखडलेले वेतन त्वरीत अदा करण्यात यावे अशी मागणी भाजपच्या वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नि. तु. पाटील यांनी केली आहे.
याबाबत वृत्त असे की, डॉ. नि. तु. पाटील यांनी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा परिषदेच्या आरेाग्य विभागाच्या अंतर्गत येणार्या ग्रामिण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी वैद्यकिय अधिकार्यांचे वेतन माहे जून पासून मिळाले नाही. गेल्या पाच महिन्यांचे वेतन रखडले आहे. यामुळे या वैद्यकिय अधिकार्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे याकडे दूर्लक्ष झाले आहे. जिल्ह्याभरातील तब्बल ८७ वैदयकिय अधिकारी रखडलेल्या वेतनाच्या प्रतिक्षेत आहेत.
यात पुढे म्हटले आहे की, कोरोनाच्या काळात ग्रामिण भागातील आरोग्य यंत्रणेवर जिवाची बाजी लावून काम करणार्या कंत्राटी वैद्यकिय अधिकारी यांना जून महिन्यापासून मासिक वेतन मिळाले नाही. जिल्ह्याभरात असे ८७ कंत्राटी वैद्यकिय अधिकारी कार्यरत आहेत. ग्रामिण भागात वैद्यकिय सेवा देत असताना पाच महिन्यांपासून वेतन नसल्याने या कंत्राटी वैद्यकिय अधिकार्यांना प्रपंच चालविणे कठीण झाले आहे. दिवाळी चार दिवसांवर येवून ठेपल्यावरही या वैद्यकिय अधिकार्यांना रखडलेले पाच महिन्यांचे वेतन देण्यासाठी जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग व जिल्हा प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात आमदार संजय सावकारे व भाजप वैद्यकिय आघाडी उत्तर महाराष्ट्राचे सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांच्याकडे तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या प्रकरणी त्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्यांसोबत चर्चा करुन या वैद्यकिय कर्मचार्यांना तातडीने वेतन दिले जावे, अशी मागणी केली आहे.
उद्धवा अजब तुझे सरकार..!
एकीकडे महाराष्ट्र शासन करोना पर्वात सुयोग्य कार्य केले म्हणून वैद्यकीय अधिकारी वर्गाच्या पाठीवर कौतुकाची थाप मारते आणि त्याच वेळी मागील ५ महिने पगार नसल्याने पोटावर लाथ मारते. वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या परिवाराने दिवाळी साजरी करायची नाही का?मा. आ.संजय सावकारे यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा करून दिवाळी निश्चितच गोड जाण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. नि. तु. पाटील यांनी केले आहे.