कलाली शिवारात हिंस्त्र प्राण्याचा धुमाकूळ

अमळनेर प्रतिनिधी | तालुक्यातील कलाली येथील शिवारात हिंस्त्र प्राण्याने केलेल्या हल्ल्यात दोन गुरे आणि तीन रानडुकरे ठार झाले असून यामुळे परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

अमळनेर तालुक्यातील कलाली येथील शिवारात काल हिंस्त्र प्राण्याने धुमाकूळ घातला. गजानन भादु पाटील यांच्या मालकीची गाय सायंकाळी परत नाही आली यावेळी त्यांनी सकाळी गाईचा शोध घेतला असता शेतात ही गाय मृतावस्थेत व लचके तोडलेले दिसली. तर अधिक शोध घेतला असता किशोर कोळी यांची वासरे देखील मृतावस्थेत व लचके तोडलेले आढळले याचबरोबर तीन रानडुकरांचा फडशा पाडलेला दिसला. गावालगत लेंढ्या नाल्याच्या जवळच्या शेतात ही गाय फरफटत नेली होती. यामुळे मालकांनी तातडीने ही बाब सेवानिवृत्त डीवायएसपी मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या कानावर घातली व पायाचे ठसे मागवून त्यांनी वनविभागाला माहिती दिली आहे. त्यावरून वनविभागाने तातडीने दखल घेऊन लेंढ्या नाल्यात व जंगलात सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत.

दरम्यान, प्राप्त माहितीनुसार परिसरात बिबट्याचा वावर असण्याची शक्यता असून यामुळे या भागातील शेतकरी धास्तावले आहेत.

Protected Content