मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्र सरकारने अलीकडेच जाहीर केलेल्या अग्नीपथ योजनेला देशभरातून विरोध होत असतांना आता शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी यावरून मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल करत सैन्य दलात कंत्राटी पद्धतीने सैन्य भरती करणं हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. या संदर्भात आज संजय राऊत म्हणाले की, मोदी सरकारची अशा प्रकारची प्रत्येक योजना अपयशी ठरली आहे. मोदी सरकारने आता १० लाख, २० लाख नोकर्या देण्याची घोषणा केली आहे. त्याआधी त्यांनी २ कोटी, १० कोटी नोकर्या देण्याची घोषणा केली होती. महागाई कमी करण्यासाठी आता त्यांनी अग्निपथ योजनेची घोषणा केली असून ती अतिशय घातक अशी योजना आहे.
राऊत पुढे म्हणाले की, ठेकेदारीवर गुलाम किंवा सध्याचा मीडिया घेतला जाऊ शकतो. पण सैन्य कंत्राटी पद्धतीने कसं काय घेतलं जाऊ शकतं? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. ज्यांच्यावर देशाच्या सुरक्षेची जबाबदारी आहे, त्यांना चार वर्षांसाठी ठेकेदारी पद्धतीने नोकरीवर ठेवणं हा राष्ट्रीय सुरक्षा दलाचा अपमान असल्याचे प्रतिपादन संजय राऊत यांनी याप्रसंगी केले.