जळगाव प्रतिनिधी । जुन्या वादातून कंडारी गावातील तुषार प्रभाकर सुर्वे (वय ४१) यांचा दगडाने ठेचून खून केल्याचे गुरूवारी सकाळी ६ वाजता उघडकीस आले होते. अवघ्या सहा तासात एलसीबीने संशतिय तिघांना अटक केली असून खूनाची कबुली दिली आहे. याप्रकरणी तिघांना नाशिराबाद पोलीस ठाण्यात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खाक्या दाखवताच तिघांनी दिली गुन्ह्याची कबुली
विशाल देविदास मराठे (वय २२), राहुल नरेंद्र जाधव (वय १९) व गोपाळ दिलीप भुसारी (वय २२, तिघे रा. कंडारी) असे अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. एलसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी १२ वाजता या तिघांना ताब्यात घेतले होते. त्यांना पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. जुन्या वादातूनच हा खून केल्याचे संशयितांनी कबूल केले आहे. पोलिसांनी अवघ्या ६ तासांत या खुनाचा तपास लावला.
जुन्या वादातून केला खून
बुधवारी रात्री रायपूर येथील उपसरपंच वसंत सीताराम धनगर व तुषार दोघांनी खळ्यात मद्यप्राशन केले. त्यानंतर धनगर हे तेथून निघून गेले होते. त्यानंतर रात्री ९ वाजता विशाल, राहुल व गोपाळ हे तिघे तुषार प्रभाकर सुर्वे (वय ४१) यांच्या खळ्यात पोहोचले. सुर्वे व राहुल यांच्यात नेहमीच वाद होत असे. याच जुन्या वादातून रात्री पुन्हा एकदा भांडण झाले. या वेळी राहुलने सुर्वे यांच्या डोक्यात दगड घालून त्यांना ठार केले.गुरुवारी सकाळी ६ वाजता प्रल्हादराव शिवाजी देशमुख यांना सुर्वे यांचा मृतदेह आढळून आला होता.
पोलीसांची घटनास्थळी धाव
अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, भुसावळ उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक बापू रोहोम, नशिराबाद पोलिस ठाण्याचे सहा. निरीक्षक प्रवीण साळुंखे, सचिन कापडणीस, विजयसिंग पाटील, नरेंद्र वारुळे, दर्शन ढाकणे, प्रवीण ढाके, सतीश पाटील, राजू सोळंखे व किरण बाविस्कर यांनी घटनास्थळी धाव घेतली.