औरंगाबाद (वृत्तसंस्था) औरंगाबादमधील निवासी डॉक्टरांनी दोन महिन्यांपासून वेतन थकल्याने अखेर संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. सरकारला त्यांनी १५ ऑगस्टपर्यंत वेतन देण्याचा अल्टिमेटमही दिला आहे.
महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रिसिडन्ट डॉक्टरने औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना याबाबत पत्र दिले आहे. पत्रात म्हटलेय की, आम्ही सर्व निवास डॉक्टर मागील ५ महिन्यांपासून ‘कोव्हिड-१९’ या जागतिक महामारीमध्ये ड्युटी करत आहोत. मागील २ महिन्यांपासून आम्ही निवासी डॉक्टरांचे वेतन रखडलेले आहे. याबाबत अधिष्ठातांना पत्र पूर्वीच दिले आहे. रुग्णांची सेवा हीच आमची प्राथमिकता आणि ध्येय आहे. त्यांची गैरसोय होणार नाही. मात्र, १५ ऑगस्टपर्यंत विद्यावेतन जमा न झाल्यास आम्ही संपावर जाऊ याची नोंद घ्यावी.