जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ओरीयन सी.बी.एस.ई. इंग्लिश मिडियम स्कूल येथिल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेच्या पटांगणात आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांचा मेळावा भरविण्यात आला होता. प्राथमिक विभागातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी विठू माऊली तसेच रुक्मणी माऊली आणि वारकऱ्यांची वेशभूषा परिधान केलेली होती.
ज्ञानोबा माऊली तुकाराम नामाचा जयघोष, टाळ मृदंगाच्या गजरात, खांदयावर भगवी पताका व डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेले वारकरी विद्यार्थी अशा भक्तिमय वातावरणात बुधवारी सकाळी हा कार्यक्रम संपन्न झाला. ओरीयन सीबीएसई स्कूलच्या मुख्याध्यापिका सुषमा कंची यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सोहळ्यात प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुखमाई यांची पालखी काढून, भजन-भावगीत, लेझिम व नृत्य सादर केले. अनेक विद्यार्थी वारकऱ्यांच्या व मराठमोळ्या पारंपारिक वेषात उपस्थित होते. विठ्ठल रूक्मिणी चा वेश धारण केलेले विद्यार्थी दिंडीच्या अग्रभागी होते. मुख्याध्यापिका सुषमा कंची यांच्यासह प्राथमिक विभागातील शिक्षिकांनी विठ्ठल रुखमाई च्या प्रतिमेचे पूजन केले. विठुरायाचे अभंग आणि ज्ञानोबांचे पसायदान गाऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहल कुडे आणि पुनम सुर्वे यांनी केले. तसेच स्वाती पाटील मॅडम यांच्याकडून आभार प्रदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. के.सी.ई. संस्थेचे अध्यक्ष प्रज्ञावंत नंदकुमार बेंडाळे यांनी आषाढी एकादशी निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.