ओबीसीच्या हक्कांचा पंकजा मुंडे यांच्याकडून पुनरुच्चार

 

मुंबई: वृत्तसंस्था । आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यातील ओबीसी समाज आक्रमक झाला असतानाच आता भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी मैदानात एन्ट्री घेतली आहे. त्यांनी ट्विट करून ओबीसी समाजाला त्यांचा हक्क देण्याची मागणी केली.

भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी ओबीसी समाजाच्या हक्कांसाठी लोकसभेत केलेल्या भाषणाच्या व्हिडीसोबत पंकज मुंडे यांनी ‘आम्हीही याच देशातील आहोत, आमचीही जनगणना करा… ओबीसींची जनगणना आवश्यक आणि अनिवार्य आहे’, अशी कॅप्शन लिहली आहे. त्यामुळे आगामी काळात ओबीसी समाजाच्या मागण्यांच्या मुद्द्यावरुन आक्रमक होण्याचे संकेत पंकजा मुंडे यांनी दिले आहेत.

सुरुवातीला फडणवीस गटाशी असलेल्या वादामुळे पंकजा मुंडे पक्षात बाजुला सारल्या गेल्या होत्या. त्यानंतर भाजपकडून पंकजा मुंडे यांचा केंद्रीय कार्यकारिणीत समावेश करण्यात आला. त्यामुळे पंकजा राष्ट्रीय स्तरावरील कामांमध्ये बिझी झाल्या होत्या.

मात्र, आता आरक्षणाच्या मुद्द्यावरुन महाराष्ट्रातील राजकारण तापले असताना पंकजा मुंडे यांनी ट्विट करून पुन्हा स्थानिक राजकारणात परतण्याचे संकेत दिल्याचे मानले जात आहे. एकनाथ खडसे यांच्यासारखा तगडा ओबीसी नेता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेला आहे.

महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून भाजपकडून ओबीसी समाजावर अन्याय होत असल्याचे वारंवार सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत पंकजा मुंडे या भाजपसाठी सक्षम ओबीसी चेहरा ठरू शकतात. त्यामुळे भाजप त्यांना पुन्हा महाराष्ट्रातील राजकारणात सक्रिय करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जालन्यात आज ओबीसी समाजाकडून मोर्चा काढण्यात आला सुरुवातीला पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली होती. मात्र, नंतर मोर्चा काढण्यास सशर्त परवानगी देण्यात आली.

या मोर्चासाठी राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार जालन्यात आले त्यांच्या हस्तक्षेपामुळेच पोलिसांनी मोर्चाला परवानगी दिली. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावाल तर सगळा ओबीसी समाज एकत्र आहे, असा इशारा यावेळी विजय वडेट्टीवार यांनी दिला.

Protected Content